प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:35 AM2021-09-09T04:35:23+5:302021-09-09T04:35:23+5:30
गोंदिया : सद्यस्थितीत सर्वच बहुतांश रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रूपये करण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही येथील ...
गोंदिया : सद्यस्थितीत सर्वच बहुतांश रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रूपये करण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रूपये आहेत. त्यामुळे हे दर कमी करण्यात यावे व प्रवासी गाड्या लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीने केली आहे. यासाठी समितीच्या वतीने रेल्वे स्थानक प्रबंधक एन. आर. पाती व रेल्वे अधिकारी सुजित कुमार यांना सोमवारी (दि. ६) निवेदन देऊन करण्यात आली आहे. तसेच दर त्वरित कमी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरताच सर्व गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत सुद्धा १० रूपयावरून ५० रुपये करण्यात आली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताच हळूहळू सर्व नियमावली शिथिल करण्यात आली. तसेच भंडारा, नागपूर, अकोला, वर्धा, भूसावळ, रायपूर, बिलासपूर, राजनांदगाव, डोंगरगड या जिल्ह्यांमध्ये प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर नेहमीप्रमाणे दहा रुपये करण्यात आले. आहे. मात्र गोंदिया स्थानकावर आजही प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ५० रूपये आहेत. या संबंधात या आधीही दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वे सल्लागार समितीने दर कमी करण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले आहे. तरी सुद्धा यावर रेल्वेने अद्यापही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. करिता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर त्वरित कमी करून १० रूपये करावे.
तसेच रेल्वेने वर्षभरापासून प्रवासी गाड्या बंद करून स्पेशल गाड्या सुरू ठेवल्या आहेत. यासोबतच गाड्यांमध्ये प्रवास भाडे देखील दुप्पट केले आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशात प्रवासी गाड्या सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या अशी मागणी समितीने केली आहे. निवेदन देताना समितीचे सदस्य सूरज नशिने, दिव्या भगत- पारधी, हरीश अग्रवाल, भेलूमन गोपलानी, छैलबिहरी अग्रवाल, अखिल नायक प्रामुख्याने उपस्थित होते.