‘रेफर टू’ जीएमसी नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 09:37 PM2017-08-19T21:37:49+5:302017-08-19T21:38:23+5:30
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील एकमेव महिला रूग्णालय असलेल्या गंगाबाईत दररोज रूग्णांची रेलचेल असते. रूग्णांची सेवा करणे डॉक्टरांचे आद्य कर्तव्य आहे, या धारणेला तिलांजली देऊन गंगाबाईत येणाºया रूग्णांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बहुतांश रूग्ण गंगाबाईत आल्यावरही कंटाळून परत खासगी रूग्णालयाकडे धाव घेतात. त्यावरही जे रूग्ण आहेत त्यापैकी अनेक गंभीर रूग्णांना डॉक्टरांचा अभाव, उपकरणांचा अभाव, साहित्याचा तुटवडा दाखवून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले जाते. या सात महिन्यांत गंगाबाईतून ३४८ रूग्णांना नागपूरला रेफर केले आहे.
गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांची संख्या पाहता सर्वच उपकरण कमी पडत आहेत. एकमेव असलेल्या महिला रूग्णालयात अतिदक्षता कक्ष (आयसीयू) नाही. या ठिकाणी व्हेंटीलेटर ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे गंभीर गर्भवती महिलांना नागपूरला पाठविले जाते. सिकलसेल तसेच एसएस पॅटर्न रूग्णांनाही या ठिकाणी दाखल केले जात नाही. गरोदर मातांना हृदयरोग असल्यास त्यांना नागपूरला रेफर केले जाते. अंडाशयाचा कर्करोग असणाºया महिला, गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या महिला दुसºया, तिसºया किंवा चवथ्या स्टेज मध्ये असल्या त्यांनाही रेफर केले जाते. रात्रीच्या वेळी बधिरीकरण तज्ज्ञ राहत नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रेफर केले जाते. किडणी निकामी झालेल्या, झटके येणाºया महिलांचा उपचार या ठिकाणी न करता त्यांना सरळ रेफर केले जाते.
गंगाबाई स्त्री रूग्णालयातून जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या काळात ३४८ रूग्णांना जीएमसी नागपूरसाठी रवाना केले आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिला १९२, गंगाबाईत जन्माला येणारे व नवजात अतिदक्षता कक्षा (एसएनसीयू) मधील ६७ तर बालरोग विभागातील ८९ बालकांना रवाना करण्यात आले.
नागपूरला जाण्यासाठी रूग्णवाहिका नाही
गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रूग्णांना डॉक्टरांकडून नागपूर रेफर केले जाते. परंतु गंगाबाईत रूग्णवाहिका उपलब्ध नसतात. शिशू सुरक्षा योजनेंतर्गत मोफत रूग्णवाहिका देणे आवश्यक असतानाही गंगाबाईतून रूग्णावाहीका देत नाही. या ठिकाणी तीन रूग्णवाहीकांपैकी दोन रूग्णवाहीका बंदच आहेत. तीन पैकी दोन रूग्ण वाहीका ३ लाख किमी.पेक्षा अधिक चालल्या आहेत. २ लाख ७५ हजार किमी.जुन्या रूग्णवाहिकांना वापरण्याची मनाई शासनाची असताना गंगाबाईत जीर्ण रूग्णवाहिकांमधून रूग्णांना सोडावे लागते. काही रूग्णांना रूग्णवाहिका मिळत नसल्याने जीव वाचविण्याच्या आकांतात नातेवाईक खासगी वाहनाने रूग्णांना नागपूरला नेतात.
एनजीओकडे कंत्राट
प्रसूती करण्यापूर्वी गर्भवती महिलांच्या सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे. परंतु गंगाबाईत बहुतांश चाचण्या होत नाही. या चाचण्या करण्यासाठी शासनाने एनजीओला कंत्राट देऊन सर्व चाचण्या मोफत करण्याची सोय करून दिली. मात्र त्या एनजीओचे कर्मचारी या तपासण्या करीत नसल्याची ओरड आहे. राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत अभियान संचालकांनी हिंद लॅबला सर्व रूग्णांच्या चाचण्या करण्याचे कंत्राट दिले. एलएफटी, केएफटी, ब्लड कल्चर, आयएनआर, पीएस फॉर एमपी अॅण्ड ओपीनियन ओअॅग्युलेशन प्रोफाईल, सीबीसी या चाचण्या करण्यात येत नाही. हिंद लॅबचे कर्मचारी दुपारी १ वाजता नंतर सेवा देत नाही. शासकीय महाविद्यालयाची सेंट्रल क्लीनिक लॅब केटीएस मध्ये कार्यान्वीत आहे. सुट्टीच्या दिवशी तसेच सायंकाळी ५ वाजतानंतर कोणत्याच तपासण्या होत नाही. बहुतांश गरोदर स्त्रीयांचा रक्त तपासणी रिपोर्ट अभावी उपचार उशीरा होतो. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात पॅथालॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री विभाग कार्यान्वीत असून सुध्दा सदर तपासण्या होत नाही.
गंगाबाईतील चाचण्या हिंद लॅबच्या कर्मचाºयांना करणे आवश्यक आहे. त्यांनी चाचण्या केल्या नाही व याबाबत तक्रार आल्यास पुढील कार्यवाही करू. जिल्ह्यातील आठ ते दहा रूग्णवाहीका मोडकळीस आल्या आहेत. मात्र गंगाबाईकडून प्रस्तावच आला नाही. यासंदर्भात आम्ही आपल्या स्तरावर उपाय योजना करू.
डॉ. देवेंद्र पातुरकर
जिल्हा शल्यचिकीत्सक, गोंदिया