लोकमतने रक्ताचं नातं अधिक खुलविलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:24+5:302021-07-03T04:19:24+5:30
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकमत समूहाने पुढाकार घेत रक्तदान शिबिराचा ...
गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत लोकमत समूहाने पुढाकार घेत रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. सर्व मानव जात ही एक आहे, हेच सांगणार नातं म्हणजे रक्ताचं नातं होय. हे नातं अधिक खुलविण्याचे कार्य लोकमत समूहाने केले आहे. लोकमत रक्ताचं नातं या महारक्तदान शिबिराचे आयोजन करून लोकमतने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.
लोकमत समूहाच्यावतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.२) स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णाच्या शासकीय रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, नगरसेविका भावना कदम, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, डॉ. संजय चव्हाण उपस्थित होते. रक्तदान शिबिराच्या सुरुवातीला स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. जिल्हाधिकारी खवले म्हणाले, कोविडच्या संसर्गामुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडल्या आहेत. अनेक कुटुंबांचा आधारवड हिरावला आहे. अनेक मुलांवरील आई-वडिलांचे छत्र हिरावल्याने अनाथ होण्याची वेळ आली आहे. अशा संकटात असलेल्यांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना आधारवड मिळवून देण्याचे महान कार्य लोकमत समूह करीत आहे. खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे. रक्तदान शिबिरासाठी लोकमत समूहाने घेतलेला पुढाकार हा खरोखरच आदर्शवत असून आपणसुध्दा रक्तदान करून मोहिमेला अधिक बळ देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी खवले यांनी दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीसुध्दा लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन समाजसेविका डॉ. सविता बेदरकर यांनी केले तर आभार लोकमत इव्हेंटचे श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. शिबिरासाठी लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी वैभव शहाणे, सचिव कावळे, वर्षा भांडारकर, माधुरी परमार यांनी सहकार्य केले.
...............
रक्तदानासाठी रक्तदाते आले पुढे
लोकमत रक्ताचं नातं रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी पुढे येत रक्तदान केले. तसेच लोकमतने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. रक्तदानापेक्षा कुठलेच दान मोठे नसून आपल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचविणे शक्य होत असल्याचा संदेश दिला.
.......
सडक अर्जुनी आणि सालेकसा येथे शिबिर
लोकमत रक्ताचं नातं रक्तदान शिबिरांतर्गत ५ जुुलै रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन येथे सकाळी ११ वाजता तर सालेकसा येथील एम. बी. पटेल महाविद्यालयात ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.