दहावीची परीक्षा घ्या नाही तर शुल्क परत करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:30 AM2021-05-20T04:30:50+5:302021-05-20T04:30:50+5:30
तिरोडा: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्यात ...
तिरोडा: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी तिरोडा तालुका भाजप विद्यार्थी आघाडीच्यावतीने शिक्षण मंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सध्या महाराष्ट्रात मागील वर्षीपेक्षाही यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे अनेकांना नको त्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातून विद्यार्थी सुद्धा सुटलेले नाहीत. या सर्व बिंदूचा विचार करून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा घेतली जाणार नाही म्हणून नुकतीच घोषणा केली आहे. परंतु नियमानुसार परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेमार्फत परीक्षा शुल्क बोर्डाला दिले आहे. शुल्क भरणारे महाराष्ट्रात एकूण विद्यार्थी १७ लाखाहून अधिक असून ६८ कोटीपेक्षा जास्त शुल्क परीक्षा बोर्डाच्या खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे जमा झालेल्या शुल्काचे काय करणार? कोरोनाच्या काळात व्यवसाय ठप्प पडल्याने पालकांचे आर्थिक नुकसान बघता सदर सर्वच दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन तिरोडा शहर भाजप विद्यार्थी आघाडीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात शहराध्यक्ष नितेश हिंगे, तालुकाध्यक्ष रजत पटले, भाजप मोर्चा शहराध्यक्ष अमोल तितीरमारे, अतुल सिंगनजुडे, गौरव कडव, उमेश रहांगडाले यांचा समावेश होता.
..........
अकरावीच्या प्रवेशाबाबत उपाययोजना काय
दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरीपण पुढील शिक्षणासाठी तथा इयत्ता ११ वीच्या प्रवेशाबाबत उपाययोजना काय. कोणत्या आधारावर किंवा कोणत्या गुणवत्तेवर प्रवेश मिळणार आहे. याची घोषणा राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील तयारी करायला मदत होईल.