बोगस प्रमाणपत्राद्वारे कामगारांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:30+5:302021-09-27T04:31:30+5:30
बोंडगावदेवी : आजघडीला जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या योजनांच्या नावाखाली अनेक दलाल पाय ...
बोंडगावदेवी : आजघडीला जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या योजनांच्या नावाखाली अनेक दलाल पाय पसरवून गावागावात बोगस प्रमाणपत्राच्या माध्यमातून कामगारांचे नोंदणी अभियान सर्वत्र सुरू आहे. बांधकाम कामगारांची बोगस नोंदणीची चौकशी करण्याची मागणी स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धम्मपाल उके यांनी केली.
संघटनेच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ आहे. यामार्फत शैक्षणिक व आरोग्यासह २७८ योजना राबविल्या जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना मंडळाकडे नोंदणी करावी लागते. दोन प्रकारचे इमारत बांधकाम कामगार आहेत. किमान ९० दिवस काम करणाऱ्या मजुरांना मंडळाकडे नोंदणी करता येते. त्यासाठी बांधकाम मजूर असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु आजघडीला जनतेला विविध योजनांचे आमिष दाखवून काही लोक पैसे घेऊन कामगार नोंदी करण्याचा सर्रास प्रकार करीत असल्याचे म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात नोंदणीसाठी मंडळाकडे मजुरांचे अर्ज जात असल्याने खऱ्या कामगारांवर गदा येत असल्याचे बोलल्या जात आहे. बोगस प्रमाणपत्र देणारे तसेच साध्याभोळ्या जनतेला विविध योजनेचे लॉलीपॉप दाखविणाऱ्या एनजीओची चौकशी करण्याची मागणी स्वराज्य बांधकाम कामगार संघटना जिल्हा गोंदियाचे अध्यक्ष धम्मपाठ उके यांनी केली आहे.