ग्रामपंचायतीच्या विद्युत पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:48+5:302021-06-28T04:20:48+5:30
देवरी : वीज वितरण कंपनीद्वारे ग्रामपंचायत स्तरावर गावातील पथदिव्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीचे निवेदन देवरी ...
देवरी : वीज वितरण कंपनीद्वारे ग्रामपंचायत स्तरावर गावातील पथदिव्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीचे निवेदन देवरी तालुका सरपंच सेवा संघातर्फे शुक्रवारी (दि. २५) आमदार सहषराम कोरोटे आणि वीज वितरण कंपनी, देवरीचे उपकार्यकारी अभियंता परिहार यांना दिले.
देवरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या गावांतील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे गावातील नागरिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत आहेत. पूर्वीपासून वीज वितरण कंपनी व ग्रामपंचायतीच्या स्तरावर वीजजोडणीबाबतचा करार हा जिल्हा परिषदेसह झाला आहे. यात केवळ देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही ग्रामपंचायतीकडे आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला वीज वितरण कंपनीचे जवळपास दोन ते पाच लाखांपर्यंतचे वीज बिल भरण्याचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. यात सुरुवातीपासून वीज बिल भरण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीला दिली तर ग्रामपंचायतींची एवढी थकबाकी राहिली नसती. एकाच वेळी ग्रामपंचायतींवर वीज बिलाचा बोजा आल्याने एवढी रक्कम भरायची कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी वीज बिलाच्या भरण्याविषयी पुढाकार घेऊन यावर ताेडगा काढण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावर त्वरित तोडगा न काढल्यास तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच सरपंच सेवा संघाच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात सरपंच सेवा संघ देवरी तालुक्याचे अध्यक्ष तथा फुक्कीमेटाचे सरपंच विनोद भेंडारकर, संजय राऊत, कृपासागर गोपाले, रेखा तरोणे, मनोहर राऊत, नीतेश भेंडारकर, सोनू नेताम, धनश्री गंगासागर, गरिबा टेंभुर्रकर, गुणवंता कवास, मीरा कुंजाम, कल्पना गोस्वामी, माधुरी राऊत, भारती सलामे, शामकला गावळ यांचा समावेश होता.