तरूणीला केले भावाच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:49 PM2018-07-20T23:49:54+5:302018-07-20T23:50:56+5:30
लगतच्या छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथून घरून निघून येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या १९ वर्षीय तरूणीला रेल्वे सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. तिची चौकशी करून तिच्या घरी माहिती पोहोचविली व ओळख पटल्यावर तिला तिच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लगतच्या छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथून घरून निघून येथील रेल्वे स्थानकावर आलेल्या १९ वर्षीय तरूणीला रेल्वे सुरक्षा दलच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. तिची चौकशी करून तिच्या घरी माहिती पोहोचविली व ओळख पटल्यावर तिला तिच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.
रेल्वे सुरक्षा दल व सीआयबीचे उपनिरीक्षक एस.एस. बघेल, प्रभारी आरक्षक यू.के. कुलदीप, आर.सी. कटरे, आरक्षक एल.एल. बघेल व महिला आरक्षक राबिया गुरूवारी (दि.१९) रेल्वे स्थानकावर गस्तवर होते. दरम्यान त्यांना प्लॅटफॉर्म-१ वर सकाळी १० वाजता १९ वर्षीय तरूणी घाबरलेल्या स्थितीत एकटीच असल्याचे दिसले. तिची चौकशी केल्यावर तिने आपले नाव व पत्ता सांगितला. यावर तिला महिला आरक्षक राबिया खातून यांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात नेण्यात आले. तिच्या घराची माहिती घेवून त्यांना सूचना देण्यात आली.
सदर युवतीचा मोठा भाऊ दुर्गवरून येथील रेल्वे सुरक्षा दलच्या कार्यालयात पोहोचला. तिला कधीकधी मानसिक दौरा पडत असून त्यावेळी ती घरून निघून कुठेही जाते व थोड्या वेळाने बरीसुद्धा होत असल्याचे तिच्या भावाने सांगितले. दरम्यान सदर तरूणीने आपल्या भावाची व भावाने बहिणीची ओळख सादर केल्यावर पुढील कार्यवाही करून रेल्वे सुरक्षा दलने तिला तिच्या भावाच्या स्वाधीन केले.