लॉकडाऊन शिथिल करून व्यापारी, मजूर वर्गाला दिलासा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:33 AM2021-05-25T04:33:10+5:302021-05-25T04:33:10+5:30
गोंदिया : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत लॉकडाऊन करणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तू सोडून सर्वच बंद करण्याचे आदेश दिले गेले ...
गोंदिया : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत लॉकडाऊन करणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तू सोडून सर्वच बंद करण्याचे आदेश दिले गेले असल्याने शहरातील व्यापारी आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना घरी बसावे लागले आहे. आता रुग्णसंख्येतील घटना बघता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करून सर्वच दुकाने काही काळासाठी तरी उघडी करावी आणि नंतर वेळ पाहता लॉकडाऊन संपुष्टात आणावे, अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी पालकमंत्री नवाब मलीक यांच्याकडे केली आहे.
आमदार अग्रवाल यांनी, वाढती रुग्णसंख्या बघता लॉकडाऊन करणे गरजेचे होते. अशात सकाळी ७ से ११ वाजतापर्यंतच सर्व जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्यासंबंधी सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. ज्यामुळे सकारात्मक आढळणाऱ्या रुग्णसंख्येत घट बघावयास मिळाली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच दुकाने बंद आहेत आणि त्यामार्फत रोजगार प्राप्त करणारे सुद्धा घरीच बसलेले आहेत. अशात वीजबिल, परिवाराचे पालनपोषण असा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दुसरीकडे बँके आणि विविध फायनान्स कंपनी नागरिकांना पैसे जमा करण्यासाठी सांगत आहेत. जर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले नाही तर नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित होईल. करिता कमी झालेली रुग्णसंख्या लक्षात घेता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करून सर्वच दुकाने काही काळासाठी तरी उघडी करावी आणि नंतर वेळ पाहता लॉकडाऊन संपुष्टात आणावे, अशी मागणी पालकमंत्री मलीक यांच्याकडे केली आहे. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्र्यांनी लवकरच लॉकडाऊन शिथिल करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना दिले.
---------------------
शिथिलतेसोबत टेस्टिंग वाढविणे गरजेचे
यावेळी पालकमंत्र्यांनी आमदार अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र त्याचसोबत मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुद्धा वाढवणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे वेळेत कोरोना रुग्णांची माहिती कळेल आणि विषाणूचा प्रसार कमी होईल, असे सांगितले.