नगर परिषद निवडणूक : भाऊ ! सोडत निघाली आता उमेदवारीचे काय ते पाहून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 04:52 PM2022-07-30T16:52:10+5:302022-07-30T16:54:04+5:30
इच्छुकांची यादी लांबलचक, कुणाला डावलायचे नेत्यांसमोर पेच
गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव, तिरोडा नगर परिषदेसाठी आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. आरक्षण सोडतीनंतर या तिन्ही नगर परिषदेच्या प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षण सोडतीचा काही दिग्गज उमेदवारांना फटका बसला असून, त्यांच्यावर सुरक्षित प्रभाग शोधण्याची अथवा सौभाग्यवतीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सोडतीनंतर इच्छुकांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या घरी हजेरी लावत सोडत निघाली. आता उमेदवारीचे तेवढे पाहून घ्या, असे म्हणत त्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाला. तर आमगाव नगर परिषदेसाठी प्रथमच निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. सध्या तिन्ही नगर परिषदांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम केव्हा जाहीर होतो. याकडे राजकीय मंडळी आणि इच्छुकांचे मागील पाच महिन्यांपासून लक्ष लागले होते. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर यासाठी गुरुवारी तिन्ही नगर परिषदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे, त्या प्रभागातील नागरिकांसाठी थोर पुरुषांच्या जयंतीचे औचित्य साधून जेवणावळीचे आयोजन केले जात आहे. तरी प्रभागातील छोट्या छोट्या कार्यक्रमांना इच्छुक आवर्जून हजेरी लावत आहे.
उमेदवारासाठी कोणता निकष लावायचा
नगर परिषदेसाठी जागा मोजक्या आणि इच्छुकांची संख्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षात मोठी आहे. तर काही दिग्गज सदस्यांनी आपल्याला निवडणूक लढता येणार नसल्याने आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी यासाठी आतापासूनच नेत्यांकडे आग्रह धरला आहे. तर उमेदवारी देताना कुठला निकष लावायचा, कुणाला डावलायचे अन कुणाला सावरायचे, असा पेच नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.
सर्व पक्ष तरुणांना संधी देण्याच्या तयारीत
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या सर्वच प्रमुख पक्षांनी नगर परिषदेत निवडणुकीत तरुण आणि महिलांना प्राधान्य देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी उमेदवारांचा शोध घेणेदेखील सुरु केले आहे. कोणता उमेदवार कोणत्या प्रभागातून सरस ठरु शकतो याचा कानोसा घेऊन काही संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.
मग उमेदवारीची घाई कशाला
नगर परिषदेच्या निवडणुका या प्रामुख्याने ऑक्टोबर किवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे उमेदवारासाठी लाॅबिंग करणे सुरु केले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. तर नेते निवडणुकीला अजून वेळ आहे, मग उमेदवारासाठी आतापासूनच घाई कशाला म्हणून सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे.