धानपिकासाठी पाणी सोडा
By admin | Published: August 26, 2016 01:31 AM2016-08-26T01:31:19+5:302016-08-26T01:31:19+5:30
स्थानिक परिसरासह जवळच्या खेड्यापाड्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतात धान पिक रोवणी केली आहे,
शेतकऱ्यांची आर्त हाक : जमिनीला पडल्या भेगा
बाराभाटी : स्थानिक परिसरासह जवळच्या खेड्यापाड्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतात धान पिक रोवणी केली आहे, पण या ग्रामीण भागात मात्र पाऊस कमी पडला आहे. पाण्याविना शेती कशी पिकेल असा प्रश्न उद्धभवत आहे, म्हणून शेतकरी वर्ग धरणातून पाणी द्या अशी आर्त हाक मारत आहेत.
अर्जुनी मोरगाव या संपूर्ण तालुक्यात जवळपास पंधरा दिवसापासून पाऊस नाही. परिसरात खासगी पाण्याच्या साधनांची टंचाई आहे. साधने प्रत्येक शेतकऱ्याकडे नाहीत. शेतजमीनीवर पीक आहे. त्यामुळे रोवलेल्या जमिनीला पाणी नसल्याने भेगा पडलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नसेल तर शेती पिकणार कशी? अशी चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
पाण्याचा जिल्हा असूनही पाणी मिळत नाही. तालुक्यात इटियाडोह, गोठणगाव धरण व नवेगावबांध हे दोन जलसाठा असणारे पाण्याचे स्त्रोत आहे. सदर जमिनीला पाणी मिळावे म्हणून सभा, उपोषणे झाले पण पाणी काही मिळेना. शेतात पाणी पडावा म्हणून पाट तयार झाले, पण पाणी यायला मार्ग नाही. निसर्गाच्या पाण्याने तर यंदा शेतकऱ्यांवर तलवार टांगली पण जलसाठ्याचे तरी पाणी द्या अशी मागणी येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, ब्राम्हणटोला,पिंपळगावमध्ये होत आहे.