इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडावे
By admin | Published: July 10, 2017 12:45 AM2017-07-10T00:45:09+5:302017-07-10T00:45:09+5:30
एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
शेतकऱ्यांची मागणी : भातलावणी लांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
इटखेडा : एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस लांबल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम पडणार असल्याने भातलावणीसाठी इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
हमखास पाऊस देणारी रोहीणी, मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेलीत. मधल्या काळात एक-दोन दिवस पावसाच्या सरी कोसळल्या. वातावरणात गारवा निर्माण झाला. शेतकरीबांधवानी मोठ्या लगबगीने बियाणांची जुळवाजुळव करीत धानाची नर्सरी टाकली. बियाणे रुजले व उगवले व आता लावणीच्या योग्यतेचे झाले तथापी हवामान खात्याच्या पर्जन्यविषयक अंदाजाला पार ठेंगा दाखवत पावसाने दडी मारली. वातावरणात मोठा उष्मा सुरु झाला. शेतकऱ्याच्या नजरा आशाळभूतपणे आकाशाकडे वळल्या आहेत पण पावसाचा पत्ताच नाही.
गेलेला पाऊस येईलही पण गेलेला हंगाम येत नाही, असे जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर धानाची नर्सरी रोवण्यायोग्य झाली असतांना शेतशिवारात पाणी नसल्याने भातलावणीचे काम लांबणीवर पडल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने त्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हंगाम मागे पडू नये यासाठी इटियाडोह प्रकल्पातून रोवण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी आहे.
आजच्या स्थितीत ज्यांना पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी विहीरी, तलाव व बोड्यातून पंपाद्वारे पाण्याचा उपसा करुन भातलावणीचे काम सुरु केले आहे. परंतु याचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या भात लावणीचे काम सुरु होण्याच्या दृष्टीने इटियाडोह सिंचन व्यवस्थापनाने कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी करीत पाणी वापर संस्थांनी यासाठी पाठपुरावा करावा असे शेतकरी बांधव बोलत आहेत. पाण्याअभावी भातलागवडीचे काम करणारा मंजूर वर्ग हाताला काम नसल्याने रिकामा आहे. त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल ही बाब सिंचन व्यवस्थापनाने लक्षात घ्यावी.