दिलासा.... लसीकरणानंतर १४ दिवसांनी करता येणार रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:22+5:302021-05-08T04:30:22+5:30
गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी व्यापक स्तरावर लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीकरणानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नसल्याच्या ...
गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी व्यापक स्तरावर लसीकरण केले जात आहे. मात्र, लसीकरणानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नसल्याच्या सूचना ‘एनबीटीसी’ने जारी केल्या होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, गुरुवारी ‘एनबीटीसी’ने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यानुसार लस घेतल्यानंतरसुद्धा १४ दिवसांनी लसीकरण करता येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ मे पासून लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. लसीकरणानंतर काही दिवस रक्तदान करता येणार नसल्याने अडचण निर्माण झाली होती. मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. परिणामी, रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, गरजूंना वेळीच रक्त मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ३५ रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. सिकलसेल, थैलिसिमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असून रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून कसे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याचे एनबीटीसी म्हटले होते. मात्र, आता यासंदर्भात नवीन सूचना जारी केल्या असून त्यानुसार लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी लसीकरण करता येणार आहे.
..........
युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे
रक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४५ ते ५० वर्षे वयोगटांतील खूप लोक आहेत. ते आता लस घेत असल्याने त्यांना पुढचे १४ दिवस रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे. लस घेण्याच्या तयारीत असलेल्या लोकांनी आधी रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
......
कोरोनामुळे रक्तदान नाहीच्याच बरोबर होत आहे. सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता आला. आता कोरोनाचे लसीकरण होत आहे. या लसीकरणासाठी कोरोनाची प्रतिबंधित लस घेणाऱ्यांना १४ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे.
- डॉ. नरेश तिरपुडे, अधिष्ठाता, मेडिकल.