दिलासा, आता हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे विकता येणार केंद्रांवर धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 09:17 PM2022-11-15T21:17:31+5:302022-11-15T21:18:00+5:30

धान खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवून देण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी  आणि शासनाला निवेदन दिले होते. त्याचीच दखल घेत शासनाने हेक्टरी धान खरेदीची मर्यादा ३० क्विंटलवरून ४० क्विंटल केली आहे. यासंबंधीचे आदेश शासनाने मंगळवारी (दि.१५) काढण्यात आले. आता धान खरेदीच्या ऑनलाईन  पोर्टलवर हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

Relief, paddy at centers can now be sold at 40 quintal per hectare | दिलासा, आता हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे विकता येणार केंद्रांवर धान

दिलासा, आता हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे विकता येणार केंद्रांवर धान

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रावर आता प्रतिहेक्टर ४० क्विंटलप्रमाणे धान खरेदी केली जाणार आहे. याला शासनाने मंजुरी दिली असून ऑनलाईन पोर्टलवर हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू असून बुधवारपासून (दि.१६) या नवीन मर्यादेनुसार धान खरेदी केली जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी केली जात आहे. यंदा शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल ३० प्रमाणे धान खरेदी करण्याचे आदेश काढले होते. मात्र, जिल्ह्यातील धानाचे हेक्टरी उत्पादन अधिक असल्याने ३० क्विंटल ही मर्यादा फार कमी असल्याची ओरड शेतकऱ्यांची होती. धान खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवून देण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी  जिल्हाधिकारी  आणि शासनाला निवेदन दिले होते. त्याचीच दखल घेत शासनाने हेक्टरी धान खरेदीची मर्यादा ३० क्विंटलवरून ४० क्विंटल केली आहे. यासंबंधीचे आदेश शासनाने मंगळवारी (दि.१५) काढण्यात आले. आता धान खरेदीच्या ऑनलाईन  पोर्टलवर हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे. बुधवारपासून या नवीन आदेशानुसारच धान खरेदी केली जाणार आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील हजारो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

११४ धान खरेदी केंद्रावरून होणार खरेदी 

- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा खरीप हंगामात धान खरेदीसाठी ११४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. या सर्व धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहे. या केंद्रावर मंगळवारपर्यंत १२३४५ क्विंटल धान खरेदी झाली आहे तर बुधवारपासून धान खरेदीच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

३० नोव्हेंबरपर्यंत करता येईल नोंदणी 
- शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले होते. नोंदणी करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती पण हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित असल्याने शासनाने पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

शासकीय धान खरेदी केंद्रावर बुधवारपासून हेक्टरी ४० मर्यादेनुसार धान खरेदी केली जाणार आहे. यासंबंधीचे आदेश मिळाले असून हा डाटा अपलोड करण्याचे काम सुरू आहे. 
- मनोज बाजपेयी, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी

शेतकऱ्यांच्या निवेदनाची घेतली दखल 
- धान खरेदीच्या हेक्टरी मर्यादेत वाढ करण्यात यावी यासाठी आठवडाभरापूर्वी अविनाश काशीवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याच निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर धान खरेदीची हेक्टरी मर्यादा ३० वरून ४० क्विंटल करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. 

 

Web Title: Relief, paddy at centers can now be sold at 40 quintal per hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.