पुन्हा केटीएसमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:49+5:302021-05-07T04:30:49+5:30
गोंदिया : कोरोना रुग्णांना दिल्या जाणा-या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन ...
गोंदिया : कोरोना रुग्णांना दिल्या जाणा-या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना पकडले आहे. ही कारवाई ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
दोन्ही कर्मचारी रेमडेसिविर इंजेक्शन १८ हजार रुपये प्रतिदराने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी केटीएस रुग्णालयातील सफाई कामगार सागर पटले, रा. मोठा रजेगाव याला इंजेक्शनची विक्री करताना रंगेहाथ पकडले. सागर पटले याच्याकडे ते इंजेक्शन कुठून आले, यासंदर्भात विचारणा केली असता केटीएस रुग्णालय गोंदिया येथे अधिपरिचारक (स्टाफ ब्रदर) म्हणून कार्यरत असलेला अशोक उत्तमराव चव्हाण, रा. शास्त्री वाॅर्ड, गोंदिया याच्याकडून आणल्याचे सांगितले. अशोक उत्तमराव चव्हाण याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याने ते इंजेक्शन केटीएस रुग्णालय, गोंदिया येथील औषध भांडारातून आणल्याचे सांगितले. त्या दोघांच्या ताब्यातून दोन रेमडेसिविर इंजेक्शन व दोन मोबाइल असा एकूण ३२ हजारांचा माल जप्त करण्यात आला. आरोपी सागर राजेंद्र पटले (२०), रा. मोठा रजेगाव, ता. किरणापूर, जि. बालाघाट, अधिपरिचारक अशोक उत्तमराव चव्हाण या दोघांविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४ सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, पाल कापगते, लीलेंद्रसिंह बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, अजय राहांगडाले, विजय मानकर, संतोष केदार, महिला पोलीस शिपाई गेडाम यांनी केली आहे.
.......
एकाच दिवशी दोन कारवाया
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. रुग्णांसाठी येणा-या इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केली जात आहे. याची ओरड वाढल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एकूण चार जणांवर कारवाई केली आहे.
......
कुठे गेले नोडल अधिकारी
खासगी नव्हे तर आता शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचे पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईनंतर शिक्कामाेर्तब झाले आहे. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच स्वत:च्या नियंत्रणाखाली रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण सुरू ठेवले आहे. पण, यानंतर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असल्याने नोडल अधिकाऱ्यांचे लक्ष नेमके कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.