शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या उपसरपंचाला पदावरुन दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:26 AM2021-02-15T04:26:14+5:302021-02-15T04:26:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथील उपसरपंचांनी पदाचा दुरुपयोग करुन शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरमाडी येथील उपसरपंचांनी पदाचा दुरुपयोग करुन शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन दूर करण्यात यावे, अशी तक्रार नरेश धनराज ठवकर यांनी उपायुक्तांकडे केली होती. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही यासंदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडूनच उपसरपंचाना अभय दिले जात असल्याचा आरोप ठवकर यांनी केला आहे.
याविषयी प्राप्त माहितीनुसार मुरमाडी येथील उपसरपंचाना सन २०१७-१८मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. सन २०१७पासून ते उपसरपंच पदावर कार्यरत असतानाही शासकीय योजनेचा लाभ त्यांनी घेतला. हा पदाचा दुरुपयोग असून, त्यांना त्वरित पदावरुन दूर करण्यात यावे, या संदर्भातील तक्रार ठवकर यांनी तिरोडा पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडेही केली होती. परंतु, त्यांनी या प्रकरणाची दखल न घेतल्याने ठवकर यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (विकास) यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ८ डिसेंबर २०२०ला पत्र देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, याप्रकरणी अद्याप कुठलीही चौकशी करुन कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठवकर यांनी पुन्हा याविषयी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.