विश्वकर्मा यांना पदावरून हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:18 AM2021-02-22T04:18:30+5:302021-02-22T04:18:30+5:30
गोंदिया : जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता पदावर संजय विश्वकर्मा कार्यरत असतानाच त्यांच्याकडे बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंताचाही ...
गोंदिया : जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता पदावर संजय विश्वकर्मा कार्यरत असतानाच त्यांच्याकडे बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंताचाही पदभार देण्यात आला आहे. ते आर्थीक व्यवहार केल्याशिवाय काम करीत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनधींनी राज्याच्या ग्रामविकास मंत्र्याकडे केल्या आहेत. तरी देखील त्यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे मेहरबान का असा सवाल उपस्थित होत आहे.
लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता विश्वकर्मा यांनी जेव्हापासून कारभार हाती घेतला तेव्हापासून जिल्ह्यातील विकास कामे रखडली आहेत, अशी तक्रार अर्जुनी-मोरगाव विधानसभाक्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी ग्रामविकास मंत्री हनफ मुश्रीफ यांच्याकडे केली होती. परंतु त्यांच्या या तक्रारीकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुध्दा ही तक्रार केली आहे. विश्वकर्मा यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम व लघुपाटबंधारे विभाग दोन महत्वाचे विभाग देण्यात आले आहेत. त्यांच्याकडे काही दिवस ग्रामीण विकास यंत्रणेचाही कारभार होता. सार्वजनिक बांधकाम किंवा लघू पाटबंधारे विभागाशी संबंधीत कामे काही निवडक व्यक्तींनाच देण्यात येत असून कोणती कामे कोणत्या व्यक्तीला देण्यात आली आहेत, याची माहिती जिल्हा परिषदेच्या कक्षाबाहेर येत नाही.
त्यामुळे विश्वकर्मा आर्थिक व्यवहारातून तर कामे करीत नाही, असा प्रश्न जनप्रतिनिधींमध्ये उपस्थित होत आहे. त्यामुळे विश्वकर्मा यांना या पदावरुन हटविण्याची मागणी ग्रामीण विकास मंत्र्यांकडे करण्यात आली होती. ते पत्र कार्यवाही करण्यात यावी म्हणून उपसचिवांनी जिल्हा परिषदेला पाठविले आहे. परंतु महिनाभरापासून या पत्रावर कार्यवाही झाली नाही. लाेकप्रतिनधीच्या पत्रांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केराच्या टोपलीत टाकल्याचे समजते.