चार महिन्यांपासून निराधार योजनेचे मानधन रखडले; गरीब लाभार्थ्यांनी दिवाळी कशी करावी साजरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:07 PM2024-10-25T17:07:41+5:302024-10-25T17:09:03+5:30
दिवाळीपूर्वी मानधन जमा होणार का : नारिधार लाभार्थीचे लागले आहे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या जुलै महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दिवाळीचा सण तोंडावर आहे. त्यामुळे निराधारांची दिवाळी ही अंधारात जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुपाशी व निराधार योजनेचे लाभार्थी उपाशी या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे. राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच लाभार्थ्यांचे मानधन महिन्याकाठी देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.
निराधार योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या, संजय गांधी निराधार, घटस्फोटीत, वयोवृद्ध अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे. शासनाकडून मिळणारे या योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील चार महिन्यांपासून रखडले आहे. लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून तातडीने दर महिन्याला मानधन दिले जाते. परंतु, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाअभावी शासनाने अडचणीत आणले आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन, या योजनांचा तालुक्यातील अनेक निराधार लाभार्थी लाभ घेत आहेत. ज्यांना चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, अशा लाभार्थ्यांनी काय करावे? कसे जीवन जगावे? कशाप्रकारे आपल्या औषधांची सोय करावी? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.
तहसील कार्यालय व बँकेच्या माराव्या लागतात चकरा
शासनाचे व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. निराधार योजनेचे लाभार्थी हे मानधनासाठी तहसील कार्यालय व बँकेत मानधन जमा झाले का? याची विचारणा करण्यासाठी दररोज पायपीट करत आहेत. पण गेल्या चार महिन्यांपासून त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.
"मला जुलै महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे औषधपाण्याचा खर्च कुठून करायचा. दिवाळीचा सण तोंडावर असून, मानधन जमा न झाल्यास र्ता देखील अंधारातच जाण्याची शक्यता आहे."
- रवींद्र तागडे, निराधार योजना लाभार्थी, येरंडी- बाराभाटी