रावणवाडी-कामठा-आमगाव रस्त्याचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:22 PM2018-04-22T21:22:10+5:302018-04-22T21:22:10+5:30
विधानसभा क्षेत्रातील ग्राम रावणवाडी- बिरसी विमानतळ- कामठा- पांजरा- कट्टीपार- आमगाव रस्त्याचा लवकरच जिर्णोद्धार होणार आहे. या २९ किमी रस्त्याच्या रूंदीकरण व पुनर्निमाणासाठी शासनाने हाईब्रिडी एन्युटी योजनेंतर्गत ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा क्षेत्रातील ग्राम रावणवाडी- बिरसी विमानतळ- कामठा- पांजरा- कट्टीपार- आमगाव रस्त्याचा लवकरच जिर्णोद्धार होणार आहे. या २९ किमी रस्त्याच्या रूंदीकरण व पुनर्निमाणासाठी शासनाने हाईब्रिडी एन्युटी योजनेंतर्गत ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, पुढील १० वर्षांची देखभाल-दुरूस्तीही यात समाविष्ट आहे.
चांगले रस्ते असलेल्या क्षेत्रातच उद्योगरूपी समृद्धी येते असा आमदार गोपालदास अग्रवाल यांचा विश्वास असून ते क्षेत्रातील रस्त्यांचे जाळे अधीक मजबूत व्हावे यासाठी प्रयत्नरत असतात. यातूनच रावणवाडी -कामठा मार्गावर रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचा कालवा त्यांच्या प्रयत्नातून निर्माणाधिन आहे. मध्यंतरी राज्य शासनाच्या ३०५४ विशेष दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत ११५ लाख रूपयांचा निधी नागरा-नवेगाव; गिरोला-बेलटोला; लोहारा-रतनारा; दासगाव-रायपुर-निलागोंदी; पिंडकेपार शिव मंदिर- बाजपेई वॉर्ड- मुर्री; कोरणी-कारूटोला व फुलचूर-फुलचूरटोला रस्त्यांसाठी मंजूर करविला.
आदिवासी विभागाकडून १५० लाख रूपयांचा निधी पांगडी-खर्रा; गोंडीटोला-आसोली; हासिंगटोला-निलागोंदी; हलबीटोला-मोहरानटोली; गोंडीटोला-गिरोला; हाबूटोला-बिरसी; सितुटोला-मानूटोला; बेलटोला-गिरोला; बेलटोला-निलज व मंगरूटोला-लंबाटोला रस्त्यांसाठी मंजूर करविला. याशिवाय ग्राम विकास विभागाकडून ४८२ लाख रूपये, नोव्हेंबर महिन्यात १०३६ रूपयांचा निधी तर मुख्यमंत्री रस्ते योजनेतून १७.५० कोटींचा निधी मंजूर करविला असून यांतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. याशिवाय गरज होती त्या ठिकाणी पुलांचेही काम केले जात आहे.
अशातच रावणवाडी-कामठा-आमगाव या २९ किमी रस्त्यासाठी तसेच या रस्त्याच्या पुढील १० वर्षांच्या देखभाल- दुरूस्तीसाठी शासनाने ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाक डून निविदा प्रक्रीया सुरू असून हे झाल्यावर रस्त्याचे काम सुरू होणार आहे.
पुलासाठी ८५ लाखांचा निधीही मंजूर
विशेष म्हणजे, याच मार्गावर असलेल्या ग्राम खातीया जवळील बाघ प्रकल्पाच्या कालव्यावर पुलाच्या बांधकामासाठी ८५ लाख रूपयांचा निधी राज्य शासनाने अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. या दोन्ही कामांसाठी आमदार अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा करून प्रस्ताव शिफासरसह शासनाला सादर करविला होता. तसेच मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करून दोन्ही कामांना मंजूरी मिळविली.