जुन्या इमारतीची दुरूस्ती अशक्य
By admin | Published: August 20, 2016 12:58 AM2016-08-20T00:58:13+5:302016-08-20T00:58:13+5:30
जि.प. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत कोसळल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले
शाळा पूर्णत: जीर्ण : नवीन बांधकामाशिवाय पर्याय नाही, तीन वर्गखोल्यांचे बांधकाम होणार
परसवाडा : जि.प. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत कोसळल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले आणि सर्व जण खडबडून जागे झाले. ही इमारत पडण्याची शक्यता असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. परंतू त्याकडे दुर्लक्ष केले आणि अखेर इमारतीचे छत पडले. सुदैवाने शाळेची वेळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या शाळेला उशिरा का होईना, शिक्षण सभापतींनी भेट देऊन पाहणी केली.
लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाची कुंभकर्णी झोप उडाली. या अगोदर कित्येकदा पत्र व्यवहार व शाळेत कार्यक्रमासाठी पदाधिकारी गेले, पण त्यांना अवस्था दिसली नाही का? या अगोदर या शाळेचे अध्यक्ष आमदार झाले, त्यांना जाणीव नव्हती का? असा सवालही पदाधिकारी उपस्थित करून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सदर शाळेचे छत कोसळल्याची माहिती शिक्षण व आरोग्य सभापती यांना होती. पण कामामुळे येण्यास उशीर झाला, असे त्यांनी सांगितले. शाळेची पाहणी केल्यानंतर संपूर्ण इमारत जीर्ण झाली दुरुस्ती करता येणारच नाही. इमारत दुरूस्तीच्या लायकीचीही नाही. याकरिता ९ लाख दुरुस्तीच्या निधीतूनच नवीन अंदाजपत्रक तयार करुन नवीन वर्गखोली तयार करण्यात येईल, असे सांगितले व इतर वर्ग खोल्यांसाठी निधी येताच प्राधान्याने देणार, असे सांगितले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, जि.प. सदस्य प्रीती रामटेके, रमेश पटले, माणिक झंझाळ, मुख्याध्यापक एन.एस. रहांगडाले उपस्थित होते. (वार्ताहर)