दुरुस्त करून किंवा नवीन मशीन तरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 05:00 AM2022-06-15T05:00:00+5:302022-06-15T05:00:06+5:30
राज्य रस्ते परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध यासह अन्य समाजघटकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात स्मार्ट कार्ड तयार झाले नसावे की काय? महामंडळाने या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून, १ जुलैपासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या १ जुलैपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. असे असताना मात्र जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील पीओएस मशीन अद्याप दुरुस्त होऊन आलेली नसल्याने या आगारात स्मार्ट कार्ड योजना फसणार असल्याचे दिसत आहे. याबाबत ‘लोकमत’ने ६ जून रोजीच्या अंकात हा प्रकार उघडकीस आणला होता. यानंतर विभागीय नियंत्रकांनी या बातमीची दखल घेत महाव्यवस्थापकांना (मुंबई) पत्र पाठवून आगारांतील मशीन दुरुस्त करून द्या किंवा नवीन मशीन देण्याची मागणी केली आहे.
राज्य रस्ते परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध यासह अन्य समाजघटकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून केली जाणार होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात स्मार्ट कार्ड तयार झाले नसावे की काय? महामंडळाने या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून, १ जुलैपासून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यातही १ जुलैपासून स्मार्ट कार्ड नसल्यास संबंधितांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे.
मात्र आश्चर्याची बाब अशी की, स्मार्ट कार्डसाठी लागणारी पीओएस मशीन नसल्याने गोंदिया व भंडारा आगारांतील कामच ठप्प पडले आहे. ही बाब लक्षात घेत ‘लोकमत’ने ६ जून रोजीच्या अंकात ‘एसटीच्या स्मार्ट कार्डला नादुरुस्त पीओएस मशीनचा खोडा’ अशी बातमी प्रकाशित करून हा प्रकार उघडकीस आणला होता. याची दखल घेत विभागीय नियंत्रक महेंद्र नेवारे यांनी महाव्यवस्थापकांना (मुंबई) पत्र पाठवून आगारांतील नादुरुस्त मशीन दुरुस्त करून देण्याची किंवा नवीन मशीन देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मशीन कधी येते, हे बघायचे आहे.
कंपनी प्रतिनिधींचेही दुर्लक्ष
- पीओएस मशीनच्या या विषयाला घेऊन ट्रायमेक्स कंपनीचे नागपूर येथील प्रतिनिधी मनोज गजघाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी २-३ दिवसांत तात्पुरती व्यवस्था करून देणार, असे सांगितले होते. मात्र, त्याला आता ८ दिवस लोटले असूनही आगारांना मशीन मिळालेले नाही. यावरून कंपनीच्या प्रतिनिधींचेही या विषयाकडे दुर्लक्ष आहे, असेच म्हणावे लागेल.
योजनेला आणखी मुदतवाढीची गरज
- गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील पीओएस मशीन नादुरुस्त असतानाच भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील मशीनही नादुरुस्त असल्याची माहिती आहे. यावरून राज्यात आणखीही कित्येक आगारांतील मशीन नादुरुस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात ३० जूनपर्यंत स्मार्ट कार्ड बनवून देणे, त्यांचे अॅक्टिव्हेशन, वितरण ही कामे ठप्प पडली आहेत. परिणामी, या योजनेला एकदा मुदतवाढ दिलेली असतानाच आणखी मुदतवाढ देण्याची गरज दिसून येत आहे.
महाव्यवस्थापकांना पत्र पाठविले आहे
गोंदिया व तिरोडा आगारातील मशीन बंद असल्याने याबाबत महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून मशीन दुरुस्त करून देण्याची किंवा नवीन मशीन देण्याची मागणी केली आहे.
- महेंद्र नेवारे
विभागीय व्यवस्थापक, भंडारा