नैसर्गिक आपत्तीमधील नुकसानभरपाई द्या
By admin | Published: December 27, 2015 02:19 AM2015-12-27T02:19:24+5:302015-12-27T02:19:24+5:30
मालाची वाहतूक करताना अचानक आलेल्या पावसामुळे मालाची हाणी होऊन तो माल वापरण्याच्या लायकीचा राहिला नाही.
जिल्हा ग्राहक मंचचा निकाल : पावसामुळे झाला होता माल खराब
गोंदिया : मालाची वाहतूक करताना अचानक आलेल्या पावसामुळे मालाची हाणी होऊन तो माल वापरण्याच्या लायकीचा राहिला नाही. पण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्या नुकसानीची भरपाई देण्यास नकार दिला. शेवटी जिल्हा ग्राहक मंचाने माल वाहतूकदाराचा दावा ग्राह्यधरत त्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिला.
गोंदिया तालुक्यातील तामखेडा येथील शिवशंकर भगवानदास खंडेलवाल यांनी आपल्या बालाजी अॅग्रो प्रॉडक्ट्स या फर्मचा आठ लाखांचा विमा काढला होता. त्या पॉलिसीच्या नियमान्वये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी त्यांच्या फर्ममार्फत पाठविण्यात येणाऱ्या मालाच्या नुकसानभरपाईचा खर्च देण्यास बांधील होती. दि.८ नोव्हेंबर २००९ रोजी सदर फर्मने गोंदियातून पनवेल (मुंबई) येथे १५०० गोणी तांदूळ पाठविला होता. त्या मालाच्या वाहतुकीपोटी ४२ हजार रुपयांचा खर्च खंडेलवाल यांनी न्यू दरबार रोडवेज या वाहतूकदार फर्मकडे दिला होता. मात्र प्रवासादरम्यान अवकाळी पाऊस आला आणि त्यांचा माल पावसाने ओला झाला. त्यामुळे खंडेलवाल यांनी नुकसान भरपाई म्हणून ४ लाख २१ हजार ७०८ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे मागितली. परंतु कंपनीने तो दावा फेटाळून लावला. वास्तविक विमा कंपनीने पाठविलेल्या सर्व्हेअरच्या अहवालानुसार नुकसान भरपाईपोटी १ लाख ८० हजार ६०० रुपयांची रक्कम मिळण्यास पात्र ठरविण्यात आले होते. परंतू हा दावा कंपनीने दिला नसल्यामुळे खंडेलवाल यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे दाद मागितली. मंचाने सर्व बाजू ऐकून आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ओरिएंटल विमा कंपनीने सर्व्हेनुसार १ लाख ८० हजार ६०० रुपये नुकसान भरपाई तसेच तक्रारकर्त्यास मानसिक त्रासपोटी ३ हजार रूपये तसेच तक्रारीचा खर्च अदा करण्याचे आदेश दिले.
हा निकाल जिल्हा ग्राहक न्यायमंचचे अध्यक्ष अतुल दिनकर आळशी आणि सदस्य वर्षा पाटील यांनी दिला. (जिल्हा प्रतिनिधी)