२९१ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:18+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे उपाययोजना राबविल्या जात आहे. याचेच फलित म्हणजे मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. जिल्हा कोरोनामुक्त असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गोंदियाचा ग्रीन झोनमध्ये समावेश केल्याने जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र जिल्ह्यात मागील २८ दिवसात एकही नवीन रुग्णांची नोंद झाली नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३०९ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी शुक्रवारपर्यंत २९१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १८ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे संयुक्तपणे उपाययोजना राबविल्या जात आहे. याचेच फलित म्हणजे मागील २८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.
जिल्हा कोरोनामुक्त असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गोंदियाचा ग्रीन झोनमध्ये समावेश केल्याने जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देत बुधवार, गुरूवार, शुक्रवार या तीन दिवशी सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत काही दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यावसायीकांसह नागरिकांना सुध्दा थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून उपचार केले जात आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होत आहे.
१०५ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. सध्या जिल्ह्यातील सात क्वारंटाईन कक्षात एकूण १०५ जण उपचार घेत आहे. यामध्ये नवीन जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये ५२, एम.एस.आयुर्वेदिक महाविद्यालय कुडवा गोंदिया १७, चांदोरी ७, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, समाज कल्याण निवासी शाळा, डव्वा ६, शासकीय आश्रमशाळा इळदा १३ आणि बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ६ अशा एकूण १०५ व्यक्तींचा समावेश आहे.