लाचखोराची बिनधास्त तक्रार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2021 05:00 AM2021-11-06T05:00:00+5:302021-11-06T05:00:11+5:30
नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी, यासाठी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सोयीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे १०६५ हे टोल फ्री क्रमांक आहे. यावरूनही नागरिकांना आपली तक्रार नोंदविता येते. शिवाय, विभागाच्या कार्यालयात जाऊनही तक्रार नोंदविता येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षापासून अवघ्या जगाला कोरोनाने हेलावून सोडले आहे. यामध्ये आतापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला असून त्यापेक्षा कठीण बाब म्हणजे, लाखो लोकांच्या हातचा रोजगार हिरावला असून त्यांना दिवस काढणे कठीण झाले आहे.
मात्र अशा या कठीण समयीही लाचखोरी काही संपलेली नाही. काम करून देण्यासाठी आताही लाचखोर समोरील माणसाची परिस्थिती जाणून न घेता थेट पैसे घेत आहेत. लाचखोरीचा हा प्रकार संपला पाहिजे व लोकांमध्ये असलेली भीती निघावी, यासाठीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे.
यातून नागरिकांनी न घाबरता अशा लाचखोरांची तक्रार करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
१०६५ टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार
- नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी, यासाठी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दक्षता अभियान राबविले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या सोयीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे १०६५ हे टोल फ्री क्रमांक आहे. यावरूनही नागरिकांना आपली तक्रार नोंदविता येते. शिवाय, विभागाच्या कार्यालयात जाऊनही तक्रार नोंदविता येते.
कोणत्याही व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्या. यासाठी कार्यालयात येऊन किंवा १०६५ टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येईल. तसेच संबंधित व्यक्तीचे काम करून दिले जाणार, यामुळे घाबरण्याची गरज नाही.
- पुरुषोत्तम अहिरकर
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
अडलेले काम पूर्ण होणारच
- काम करून देण्यासाठी पैसे मागणे यालाच लाचखोरी म्हटले जाते. मात्र, लाच मागणाऱ्या त्या व्यक्तीची तक्रार केल्यास पुढे आपले काम होणार नाही, अशी भीती नागरिकांच्या मनात असते. यातूनच ते चुपचाप पैसे देऊन टाकतात. मात्र, लाच देणे सुद्धा गु्न्हा आहे. यामुळे कोणीही लाचेची मागणी केल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करा. यानंतर विभागाकडून तक्रारदाराचे काम करवून दिले जाणार. यामुळे कुणालाही लाचखोरांना घाबरण्याची गरज नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहिरकर यांनी कळविले आहे.