त्यांना घरकूलची गरज नसल्याचा अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:32+5:302021-09-25T04:30:32+5:30

सडक-अर्जुनी : कित्येकांच्या डोक्यावर छत नसून ते घरकुलाची आस लावून बसले आहेत. असे असतानाच कित्येकांना घरकूल मंजूर होऊनही ते ...

Report that they do not need a home | त्यांना घरकूलची गरज नसल्याचा अहवाल सादर करा

त्यांना घरकूलची गरज नसल्याचा अहवाल सादर करा

googlenewsNext

सडक-अर्जुनी : कित्येकांच्या डोक्यावर छत नसून ते घरकुलाची आस लावून बसले आहेत. असे असतानाच कित्येकांना घरकूल मंजूर होऊनही ते मागील ३ वर्षांपासून काम सुरू करीत नसल्याचे दिसत आहे. अशांना घरकुलाची गरज नसल्याचे गृहित धरून तसा अहवाल सादर करा, अशा सूचना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सभेत त्यांनी, रोहयो कामाशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेची प्रलंबित ९०० घरकूल, रमाई घरकूल योजनेची ७१ कामे व शबरी घरकूलची १८ कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना घरकूल अभियंत्यांना दिल्या. भटक्या व विमुक्त जातीसाठी नव्याने सुरू केलेल्या यशवंत घरकूल योजनेच्या कामांना त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करणेबाबत सूचना केली. याशिवाय अनुसूचित जाती-नवबौद्ध घटकांसाठी बांधकाम, दुधाळ जनावर, शेळी गटांचा विविध घटकांना पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, आरोग्य योजना, कोविड-१९ च्या उपाययोजना, स्वच्छ भारत मिशन कामांचाही आढावा घेतला. तालुक्यातील सर्व कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय उपलब्ध झाल्यामुळे तालुका उघड्यावर शौचास जाण्याच्या क्रुप्रथेपासून मुक्त झाला असल्याचे गटविकास अधिकारी खुणे यांनी सांगितले.

...........

३ ऑक्टोबरपूर्वी तयार करा गाव आराखडा

सर्व ग्रामपंचायतींनी सरासरी एक कोटी खर्चाचा गाव आराखडा तयार करण्याबाबत त्यांनी २१ मे रोजी पत्राव्दारे सर्व सरपंच व ग्रामसेवकांना सूचित केले होते. त्यानुसार रोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेली एकूण २६० कामे विचारात घेऊन अभिसरण करून ६०:४० या प्रमाणात कुशल व अकुशल कामे बसवून गाव विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. मात्र त्यानुसार गाव आराखडा तयार करण्यात आला नाही. अशात विशेष मोहीम घेऊन ३ ऑक्टोबरपूर्वी गाव आराखडा तयार करून तहसीलदारांना सादर करण्याबाबत ग्रामसेवकांना त्यांनी सूचना दिल्या.

.........

रोहयो अंतर्गत सर्व प्रकारची २६० कामे अनुज्ञेय असून त्याद्वारे गावांचा विकास साधणे सहज शक्य आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका रोहयो समन्वय अधिकारी, व ग्रामसेवक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याबाबत व यात कोणतीही अडचण येत असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधण्याबाबत सूचना केल्या. गाव आराखडा तयार करताना योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमातून गावातील सर्व प्रकारचे रस्ते, नाल्या, गोठे, तलावांचे खोलीकरण, शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन बांधकाम आदी सर्व मूलभूत सुविधा येत्या २ वर्षात रोहयोच्या माध्यमातून पूर्ण करता येतील, असा विश्वास आमदार चंद्रिकापुरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Web Title: Report that they do not need a home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.