गरज ७६ कोटींची मिळाले २ कोटी ६६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:19+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली होती. सुदैवाने यंदा पाऊस पाणी चांगले झाल्याने पीक देखील चांगले होते.त्यामुळे यंदा चार पैसे शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन धान कापणीला सुरूवात केली असताना परतीचा पाऊस दमदार बरसल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीपातील धानपिकांचे नुकसान झाले. यामुळे ९ हजार ५३३ हेक्टरमधील धानपिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाकडे सादर केला होता. त्या आधारावर राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असून याचा पहिला २ कोटी ६६ लाख रुपयांचा हप्ता जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.मात्र दोन्ही विभागाने पाठविलेल्या नुकसानीच्या आकडेवारीनुसार एकूण ७६ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची गरज असतांना केवळ २ कोटी ६६ लाख रुपये प्राप्त झाल्याने वाटप करायचे कसे असा पेच निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली होती. सुदैवाने यंदा पाऊस पाणी चांगले झाल्याने पीक देखील चांगले होते.त्यामुळे यंदा चार पैसे शिल्लक राहतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन धान कापणीला सुरूवात केली असताना परतीचा पाऊस दमदार बरसल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेल्या. हाती आलेले पीक पावसामुळे डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने उचल केलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा,लोकांची देणी कुठून फेडायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.परतीच्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे युध्द पातळीवर पूर्ण करुन एकूण ९ हजार ५३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून यामुळे २६ हजार २६४ शेतकऱ्यांना बसला. नुकसानीच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता दोन्ही विभागाने वर्तविली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली. त्यात पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत जाहीर केली.यानुसार मदतीचा पहिला हप्ता सर्व जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्याला प्राथमिक अहवालानुसार नुकसान भरपाईसाठी एकूण ७६ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची आवश्यकता आहे. मात्र पहिल्या हप्तात केवळ २ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मिळाल्याने वाटप करायचे कसे असा पेच प्रशासनासमोर देखील निर्माण झाला आहे.
वाटप प्रक्रियेसाठी लागणार आठ दिवस
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला २ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा निधी तहसील कार्यालयांना वितरित केला जाणार आहे. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी जमा केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे आधारकार्ड,बँक खाते क्रमांक घेतले जाणार आहे.त्यामुळे यासर्व प्रक्रियेसाठी किमान आठ दिवस लागणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.
उर्वरित निधीसाठी करावी लागणार प्रतीक्षा
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने पहिला हप्ता वितरीत केला आहे. मात्र ही रक्कम फारच तोकडी आहे.त्यामुळे शासनाकडून यासाठी पुन्हा निधी वितरीत करण्यात येणार आहे.त्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नुकसानीचा आकडा वाढणार
कृषी आणि महसूल विभागाने प्राथमिक सर्वेक्षण करुन परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र काही तालुक्यात अद्यापही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. त्यामुळे नुकसानबाधीत क्षेत्रात पुन्हा वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.