कत्तलखान्यात जाणाऱ्या १७ जनावरांची सुटका; मंडीयाटोला चौकात कारवाई
By नरेश रहिले | Published: August 18, 2023 06:42 PM2023-08-18T18:42:10+5:302023-08-18T18:42:21+5:30
चंगेरा गावाकडून तेढवा मार्गे जनावरांनी भरलेला ट्रक येत असल्याची माहिती मिळाली होती, १८ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेतर्फे पेट्रोलिंग करीत असताना कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १७ ऑगस्ट रोजी केली.
चंगेरा गावाकडून तेढवा मार्गे जनावरांनी भरलेला ट्रक येत असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रावणवाडी परिसरातील मंडीयाटोला चौक येथे नाकाबंदी लावून रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास तेढवाकडून येणारा ट्रक पकडला. त्या ट्रकमध्ये ९ म्हशी व ८ रेडे असे एकूण १७ जनावरे किंमत ३ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जनावरे अवैधरीत्या निर्दयतेने चाऱ्या-पाण्याविना कोंबून बंदिस्त केलेल्या स्थितीत आढळून आले. ट्रक आणि जनावरे असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्या जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने चारा-पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता कोरणी येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणातील फरार आरोपी चालक अजित हंसराज शहारे, रा. काटी, ता.जि. गोंदिया याच्या विरुद्ध पोलिस ठाणे रावणवाडी प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा, सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक फौजदार मधुकर कृपाण, पोलिस हवालदार सोमेंद्रसिंह तुरकर, तुलशीदास लुटे, चालक पोलिस हवालदार लक्ष्मण बंजार, पोलिस शिपाई संतोष केदार यांनी केली आहे.