सरपंचपदाचे आरक्षण नव्याने निघणार
By admin | Published: July 31, 2015 02:02 AM2015-07-31T02:02:47+5:302015-07-31T02:02:47+5:30
तालुक्यातील ७० ग्रामपंचायतमधील पदांची नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले.
आरक्षण सोडत आज : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतमधील पदांची नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. या आदेशामुळे राजकीय पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना आंद तर काहींना नैराश्य आले आहे. ही आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.३१) दुपारी २ वाजता पंचायत समिती बचत भवनात काढली जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, सरपंच पदाची आरक्षण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. तालुका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पुन्हा ही सोडत ३ जुलै रोजी काढण्यात आली. या वेळी ७० ग्रा.पं. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. हे आरक्षित सरपंच पद गृहित धरून अनेक उमेदवारांनी २५ जुलै रोजी निवडणूक लढविली. या वेळी तालुक्यात २८ ग्रा.पं. च्या निवडणुका पार पडल्या. निकाल जाहीर होताच गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांना आनंद झाला होता. सरपंच पदाच्या राजयोगाच्या मुहूर्ताची त्यांना प्रतीक्षा होती. मात्र ऐनवेळी ३० जुलै रोजी नवीन सोडतीचे आदेश धडकल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
सन २०१० च्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत लक्षात घेता नव्याने पुन्हा तेच आरक्षण निघाल्याने भरनोली (तुकुमनारायण), येरंडी-देव, अरततोंडी-दाभना व बाराभाटी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राच्या (कलि/ जिपपसनि/कावि-७४२/दि.२९ जुलै) आदेशानुसार सरपंच पदाची आरक्षण सोडत ३१ जुलै रोजी काढण्यात येणार असल्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)