पक्षी संरक्षणासाठी जलाशय संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 08:57 PM2018-01-28T20:57:13+5:302018-01-28T20:58:01+5:30

जलाशयाच्या पर्यावरण व जैवविविधतेवर इतर घटक निर्भर असतात. पण जलाशयांचे पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या अशीच परिस्थती उद्भवली आहे.

Reservoir culture for bird protection | पक्षी संरक्षणासाठी जलाशय संवर्धन

पक्षी संरक्षणासाठी जलाशय संवर्धन

Next
ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोग : जिल्ह्यातील ३० तलावांकडे विशेष लक्ष

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जलाशयाच्या पर्यावरण व जैवविविधतेवर इतर घटक निर्भर असतात. पण जलाशयांचे पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या अशीच परिस्थती उद्भवली आहे. सारस आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या या जिल्ह्यातील जलाशयांचे पर्यावरण टिकविण्यासाठी स्वयंसेवकांनी धडपड सुरू केली आहे. त्यातून परसवाडा व लोहारा अशी दोन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली असून हा राज्यातील पहिला प्रयोग ठरला आहे.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकापूर्वी ३० हजारांच्या आसपास जलाशये होती. पण आता काहीच जलाशये शिल्लक राहीली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली असल्यामुळे त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरीत पक्षी आणि सारससाठी प्रसिद्ध होता. पण जलाशयांची गुणवत्ता घसरली आणि या पक्ष्यांची संख्याही कमी झाली. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने या पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. निवडण्यात आलेल्या परसवाडा आणि लोहारा या दोन तलावांकरीता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग, वनविभागाने सहकार्य केले. जलाशयांची स्थिती, त्याची जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण या सर्वांचा अभ्यास सुरू केला. जलाशये टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेतला. या दोन तलावांनंतर जिल्ह्यातील इतर ३० तलावांसाठी त्यांनी समाजाधारीत संवर्धनावर अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि कृती आराखडा तयार केला. यात अशाच गावातील जलाशये निवडण्यात आली, ज्यांना तिथल्या वनस्पती व पक्ष्यांचे ज्ञान आहे. तलाव वाचले तर तर पक्षी वाचतील याचे ज्ञान आहे.
जिल्हा प्रशासनाकडे त्या संबंधीचा प्रस्तावही पाठविला होता. त्यानंतर पुनर्प्रस्ताव मागील मार्च व एप्रिलपासून जिल्हा प्रशासनाकडे आहे. सारसांच्या भवितव्याच्या आणि एकूणच गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक व स्थलांतरीत पक्षीवैभव जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रशासन त्या दृष्टीने पावले उचलत आहे. विशेष म्हणजे अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली आणि सलीम अली यांचे वास्तव्य राहीलेल्या आणि सारसांसाठी कधीकाळी प्रसिद्ध नवेगावबांधच्या नवेगाव तलावाचा सुद्धा यात समावेश आहे. मारूती चित्तमपल्ली यांनी अवघे आयुष्य या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी घालविले. आता त्यांचाच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सावन बहेकार, चेतन जसानी, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, अंकीत ठाकूर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे ही ‘सेवा’ ची तरूणाई करीत आहे.
जैवविविधता नष्ट होण्याची कारणे
जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षात बेशरम (इकोर्निया) सारख्या बाहेरच्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे जलाशयांची जैवविविधता नष्ट होत आहे. मासेमारी संघटनांना जलाशयावर मासेमारी करण्यासाठी लीज दिली जाते. या जलाशयांमध्ये कोणत्या प्रजातिच्या मास्यांचे आणि किती प्रमाणात, कशा प्रकारे बिज टाकावे जावे यासंबधी नियम आहेत. मात्र प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. त्याचाच फायदा घेत मासेमारी संघटना अधिक उत्पादन आणि व्यापारी दृष्टीकोणातून झटपट वाढणाºया माशांचे बीज टाकतात. त्याचा दुष्परिणाम जलाशयाच्या जैवविविधतेवर होतो. जलाशयाच्या आजूबाजूला असणाºया शेतांमध्ये रासायनिक खते आणि रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. या शेतांमधील पाणी जलाशयात येत असल्याने जलाशयातील पाण्याची गुणवत्ता खराब होते. मग्रारोहयो आणि इतर योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या निधीतून जलाशयांचे खोलीकरण केले जाते. मात्र जलाशयातील जैवविविधतेचा विचार न करता सरसकट खोलीकरण केले जाते. स्थानिक वनस्पती यामुळे नष्ट होतात त्याच्या पुनरूज्जीवनाचा विचार प्रशासन करत नाही.
जलाशय नष्ट होण्याची कारणे
शासकीय, मालगुजारी तलाव, मध्यम प्रकल्प, खासगी असे जलाशयांचे अनेक प्रकार आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत खासगी जलाशये होती. त्यातील ९० टक्के जलाशये संपली आहेत. या जलाशयांचे सिंचन मालकांपुरतेच राहीले आहे. त्यातील मासेमारीही मालकांपुरतीच होती. मात्र कुटुंब विस्तारत गेले आणि जलाशयाची जागा शेतीने घेतली आहे. माजी मालगुजारी जलाशये परिसरातील शेतीच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. खासगी तलाव संपण्याच्या मार्गावर असले तरीही इतर तलाव कसे वाचविता येतील या दृष्टीकोणातून प्रशासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे.

जलाशय वाचविण्यासाठी अनेक वर्षापासून परिसरात राहणारे लोक, काम करणाऱ्यांचे ज्ञान वैज्ञानिक गोष्टी यांची सांगड घालून तलावाचे ‘रिस्टोरेशन’ आणि व्यवस्थापन आराखडा आणि अंमलबजावणी असे तीन टप्पे आहेत. परसवाडा आणि लोहारा या जलाशयावर येणाऱ्या पक्षी, वनस्पती आणि माशांच्या प्रजातीची यादी तयार केली. बाहेरचे मासे आणि स्थानिक मासे यांची यादी तयार केली. काय करावे, काय करु नये याची यादी तयार केली. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने काम सुरु केले. या दोन्ही गावातील भिंतीवर चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न केला. याचेच फलीत हे दोन्ही जलाशय संवर्धनासाठी मॉडेल म्हणून तयार झाले.
सावन बहेकार
वन्यजीव तज्ज्ञ तथा अध्यक्ष, सेवा संस्था.

Web Title: Reservoir culture for bird protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.