परिषदेचे ठराव फक्त कागदोपत्रीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:13 PM2017-11-12T22:13:45+5:302017-11-12T22:13:55+5:30
न्यायालयाच्या परवानगी नंतर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. पाच विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत पाच मिनिटांतच निर्णय घेण्यात आला.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : न्यायालयाच्या परवानगी नंतर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. पाच विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत पाच मिनिटांतच निर्णय घेण्यात आला. मात्र सभेतील निर्णय हे न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार असल्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे सभेतील हे पाचही ठराव फक्त कागदोपत्रीच राहणार आहेत. सोमवारी (दि.१३) न्यायालयात सुनावणी असल्याने आता पुढे काय होते हे बघायचे आहे.
नगर परिषद उपाध्यक्षांच्या निवडीला घेऊन विरोधी पक्षातील सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरण न्यायालयात असल्यामुळे नगर परिषदेच्या सभांवर स्थगिती आली आहे. परिणामी नगर परिषदेच्या नवीन कार्यकाळात फक्त एकच सभा झाली आहे. त्यानंतर सभा घेण्यात आल्या नाहीत. अशात न्यायालयाच्या आदेशावरून २७ आॅक्टोबर रोजी नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. शहराशी निगडीत पाच महत्वपूर्ण विषयांवर नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी ही सभा बोलविली. महत्वाचे विषय असल्याने उपस्थित सदस्यांनी आपली सहमती दर्शविली व फक्त पाच मिनिटांतच ही सभा आटोपली होती.
सभेत पाच विषयांवर एकमताने निर्णय घेण्यात आला. मात्र पाचही ठराव फक्त कागदोपत्रीच राहणार ही बाब येथे महत्वाची आहे. कारण सभेत घेण्यात येणारे निर्णय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार असल्याचे न्यायालयाने पूर्वीच स्पष्ट करून सभेची परवानगी दिली असल्याची माहिती आहे. अशात निर्णय घेऊनही काहीच फायदा होणार नाही असे दिसून येते. अर्थात घेण्यात आलेली सभा सध्या तरी काहीच फायद्याची ठरणार नाही असे बोलले जात आहे.
सोमवारी (दि.१३) प्रकरणी न्यायालयात सुनावणी असल्याने आता या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या सुनावणीत निर्णय लागल्यास त्यानंतरच पालिकेवरील निर्बंध उठणार व सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांवर अंमलबजावणी करता येणार आहे. शिवाय अंतिम निर्णय न झाल्यास सभेतील निर्णय तसेच कागदोपत्री राहणार आहेत.
या पाच विषयांवर होती सभा
आरोग्य विभागातंर्गत सन २०१७-१८ या वर्षाकरिता किटकनाशक फवारणी करिता कमी दर मंजूरी, नगर परिषद क्षेत्रात भकट्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, नगर परिषद क्षेत्रात बेवारस डुकरांचा बंदोबस्त, बांधकाम विभागांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी तसेच नगर रचना विभागांतर्गत नगर परिषदेच्या मालकीची जागा भुखंड क्रमांक ३०-३ व १२३ मधील क्षेत्र पोलीस स्टेशन रामनगर व कर्मचारी वसाहतीकरिता हस्तांतरित करणे या विषयांवर सभा बोलाविण्यात आली होती.