शासनाच्या मदतीविनाच सामाजिक कार्य करण्याचा संकल्प
By admin | Published: January 8, 2016 02:28 AM2016-01-08T02:28:31+5:302016-01-08T02:28:31+5:30
आधुनिक व्यस्त काळात व्यक्ती केवळ आपली व परिवाराची चिंता करतो. दुसऱ्यांच्या गैरसोयी व समस्या सोडविणे तर दूरच. समाजकार्याचा विचार व तशी कृती करणारे तर नगण्यच आहेत.
हेल्पिंग हँन्ड गृप : दर रविवारी ग्रामसफाई, वृक्षारोपण व रूग्णांना मदत
गोंदिया : आधुनिक व्यस्त काळात व्यक्ती केवळ आपली व परिवाराची चिंता करतो. दुसऱ्यांच्या गैरसोयी व समस्या सोडविणे तर दूरच. समाजकार्याचा विचार व तशी कृती करणारे तर नगण्यच आहेत. समर्पित भावनेने समाजकार्य करणाऱ्या मोजक्याच संस्था असतात. देशात अनेक अशासकीय संघटन, बहुउद्देशिय संस्था आदी विविध प्रकारे जनजागृती व लोककल्याणकारी कार्यक्रम क्रियान्वित करतात. परंतु ते सर्व शासकीय अनुदानावर निर्भर असतात. अशात जे लोक नि:स्वार्थ भावाने, कोणत्याही अनुदानाविना विविध प्रकारचे सामाजिक कार्य करतात, खरोखरच ते प्रसंशनिय आहेत.
उल्लेखनिय म्हणजे तिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथे ‘हेल्पिंग हँड गृप’च्या वतीने करण्यात येणारे समाजकार्य प्रेरणादायक आहे. याचे सर्व सदस्य दर रविवारी एकत्रित येवून ग्रामसफाई, वृक्षारोपण, त्यांचे संवर्धन, दुर्बल घटकातील वृद्ध व रूग्ण नागरिकांना वेळेप्रसंगी मदत यासारखे सामाजिक कार्य शासकीय अनुदानाशिवायच करीत आहेत.
हेल्पिंग हँडचे सदस्य प्पू सैयद यांनी सांगितले, गृपमध्ये एकूण २५ सदस्य आहेत. सदस्य संख्या वाढतच आहे. सदस्यत्वासाठी वयाची अट नाही. सध्या आठ ते ५५ वर्षे वयापर्यंतचे सदस्य यात सहभागी आहेत. मंगेश पटले नामक युवकाच्या संकल्पनेतून गठित या गृपचे सदस्य कोणत्या गरीब, विधवांच्या मदतीसाठी आपसातच पैसे गोळा करून सेवा करतात. त्यांच्याद्वारे नुकतेच जवळील फकीरटोली येथील रहिवासी तुफानवी फकीर व कशीदा फकीर नावाच्या गरीब विधवांच्या गवताच्या झोपडीवर झाकण्यासाठी ताडपत्रीची सोय करून देण्यात आली.
त्यांनी सांगितले की, त्यांचा गृप भविष्यातही अशाप्रकारच्या सामाजिक जबाबदारी सांभाळत राहील. त्यासाठी शासकीय अनुदानाची आवश्यकता राहणार नाही. काचेवानी येथील ‘हेल्पिंग हँड गृप’च्या सदस्यांमध्ये मंगेश पटले, गोविंद कटरे, अजित जांभूळकर, निलेश कराडे, पप्पू सैयद, सुनील बन्सोड, संजय गुणेरिया, आदेश जांभूळकर, सागर पारधी, अमन असाटी, तुषार टोपरे, अली टायरवाला, प्रवीण पटले, कमलेश जांभूळकर, बंडू पारधी, महेश रहांगडाले, राकेश पटले, राजेश कोडवती, बालू खुडसिंगे, दादू पटले, प्रदीप फुटरे, संतोष उईके, संतोष चौधरी, मनिष पारधी व प्रशांत चौधरी यांचा समावेश आहे.
या गृपची विशेषता म्हणजे यात कोणीही अध्यक्ष किंवा सचिव नाही. सर्व समानपणे सदस्यच आहेत. (प्रतिनिधी)