गंगाबाई रुग्णालयातील समस्यांचे निराकरण करा
By admin | Published: May 6, 2016 01:32 AM2016-05-06T01:32:40+5:302016-05-06T01:32:40+5:30
येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो महिला रुग्ण उपचारासाठी येत असून दररोज अनेको रुग्णांना याठिकाणी भर्ती करण्यात येते.
गोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो महिला रुग्ण उपचारासाठी येत असून दररोज अनेको रुग्णांना याठिकाणी भर्ती करण्यात येते. अशात रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा रक्षक, वीज त्याच बरोबर स्वच्छतेसह अनेक आवश्यक गरजांची पुर्तता करणे हे रुग्णालय प्रशासनाचे कर्तव्य असून रुग्णालयातील समस्येचे निराकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान केली.
बुधवारी पटले यांनी बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान, त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील स्वच्छतेच्या समस्येबाबतीत चर्चा करून रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबवावा व सफाई यंत्रणा पूर्ववत करावी. तसेच सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करून रुग्णालयातील कुचकामी ठरत असलेली सुरक्षा यंत्रणेला कामावर लावण्यात यावे अशी मागणी केली.
यावेळी समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातुन त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांना वैद्यकीय अधीक्षक यांच्या दालनात बोलावून तत्काळ निर्णय घेऊन रुग्णांच्या समस्या सोडविण्यास सांगितले.
तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरूस्त करण्याची मागणी केली. याचप्रमाणे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना देखील बोलावून रुग्णालयाच्या परिसरात कुठल्याही प्रकारचा कचरा न ठेवता परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगितले. दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धकाते व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दोडके यांनी सर्व समस्यांचे निराकरण तत्काळ करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भरत क्षत्रिय, दीपक कदम, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, पंकज रहांगडाले, सुनील केलनका, शिवगोपाल बडगुजर, संजय मुरकुटे, ऋषिकांत साहू, कमलेश सोनवाने, अजय लौंगाणी, मुकेश हलमारे, कुशल अग्रवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)