शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 10:06 PM2019-02-15T22:06:06+5:302019-02-15T22:07:13+5:30
तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण करा यासह अन्य मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी निळकंठ सिरसाटे यांची सोमवारी (दि.११) भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रलंबित असलेले विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण करा यासह अन्य मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी निळकंठ सिरसाटे यांची सोमवारी (दि.११) भेट घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेच्यावतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या तालुका शाखेच्यावतीने तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांचे प्रश्न व समस्या याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी शिरसाटे यांची सोमवारी (दि.११) भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
चर्चेत, मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेची नियमित बैठक घेण्यात यावी, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती मधून निर्गमीत झालेले परिपत्रक प्रत्येक शाळांना पुरविण्यात यावे, शिक्षकांची पदनिहाय रिक्त व अतिरीक्त संख्या यावर चर्चा करावी, शिक्षकांची स्वतंत्र नस्ती तयार करण्यात यावी, शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड क्षेणी प्रस्ताव जिल्हा परिषद पाठविण्यात यावे, दुय्यम सेवापुस्तक अद्ययावत करावी, शालेय पोषण आहार नियमित काढावे, शिक्षण विभागाचा स्वतंत्रपणे आवक-जावक विभाग करण्यात यावा, अतिरीक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, मृत शिक्षक पुणेकर मेश्राम यांचे कुटूंब निवृत्ती वेतनासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा, सातव्या वेतन आयोगाचे परिपत्रकानुसार वेतन काढण्यात यावे, येरंडी येथील मुख्याध्यापक आर.एस.जांभुळकर यांचे प्रकरण निकाली काढण्यात यावे, शिक्षण विभागातील कर्मचाºयांशिवाय अन्य व्यक्तीकडे सेवापुस्तीका, सेवानिवृत्ती प्रकरण, थकीत वेतन बिल फाईल देण्यात येऊ नये आदी मागण्यांवर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
यावर मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांची दखल घेऊन त्या शक्य तितक्या लवकर निकाली काढू असे गटशिक्षणाधिकारी शिरसाटे यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, उपाध्यक्ष गजानन रामटेके, तालुकाध्यक्ष नरेश गोंडाणे, किर्तीवर्धन मेश्राम, राजेश साखरे, तेजराम गेडाम, धनपाल शहारे, पूनाराम जगझापे, दिलीप मेश्राम, अशोक शहारे, रेखा गोंडाणे, सुधाकर मेश्राम, यु.आर.तांदळे, एस.एच.तागडे, आर.एस.बोरकर, बिसेन इत्यादी शिक्षक उपस्थित होते.