आमदारांच्या जनता दरबारात समस्यांचे निराकरण
By admin | Published: June 1, 2017 01:09 AM2017-06-01T01:09:21+5:302017-06-01T01:09:21+5:30
गोंदिया जिल्ह्यातील गावांच्या शेत भेटीतून आ. परिणय फुके यांनी शेत शिवाराची पाहणी स्थानिक जनतेशी संवाद साधला.
बोगस सातबाऱ्यावर धान खरेदी : वाचला समस्याचा पाढा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गावांच्या शेत भेटीतून आ. परिणय फुके यांनी शेत शिवाराची पाहणी स्थानिक जनतेशी संवाद साधला. दरम्यान नागरिकांच्या समस्या आहेत. त्या ऐकून तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन २८ मे ला करण्यात आले होते. जनता दरबारात जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर ग्रामीण भागातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचून प्रशासनात कारभार चव्हाट्यावर आणला. यावर आ. परिणय फुके यांनी याबाबीची तत्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी समस्यांनी त्वरीत सोडवणूक करावी, असे निर्देश दिले.
शासकीय धान खरेदीत बोगस सातबारा तयार करून धान खरेदी करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, दासगाव इरिगेशन अंतर्गत येणाऱ्या घिवारी येथील पाणी टंचाईची समस्या तसेच धानपिकाला दहा वेळा पाणी देण्यात येणार होते. परंतु ८ वेळा पाणी देण्यात आल्याने गोंदिया तालुक्यातील १२०१ हेक्टर वरील धानपिक धोक्यात आले आहेत. सतोना येथे सन २००४-०५ मध्ये आलेल्या पुरामुळे येथील नागरिकांकरीता ८ कोटींच्या निधीतून पुनर्वसनाकरीता इमारत तयार करण्यात आली. परंतु इमारतीची दुरवस्था असल्याने नागरिक तेथे जाण्यास टाळले.
त्यामुळे या इमारतींचे दुरुस्ती करून येथे पुरबाधित नागरिकांचे पुर्नवसन करण्यात यावे, बनाथर येथील आरोग्य उपकेंद्राना प्राथमिक आरोग्य केंद्रात रुपांतरीत करण्यात यावे, दासगाव जलयुक्त शिवाराचे काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले.
गोंदिया तालुक्यात अधिकाधिक संख्येत मग्रारोहयोची कामे सुरु करण्यात यावी. जेणेकरून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार, काटी-तेढवाच्या नवीन पुलाचे निर्माण झाले. मात्र जुना पूल तोडण्यात आलेला नाही.
त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. करीता सदर जूना पूल त्वरीत तोडण्यात यावा, मुद्रा लोणमध्ये शहरी क्षेत्रातील नागरिकानाच वाटण्यात आलेले आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील बँकाना मुद्रा लोण वाटप करावे, असे आदी विविध प्रश्न नागरिकांना जनता दरबारात आ. परिणय फुके, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुखांसमोर उपस्थित केले. यावर आ. परिणय फुके यांनी संबंधित विभाग प्रमुखांना नागरिकांच्या समस्या त्वरीत सोडविण्यासाठी निर्देश दिले. मुद्रा लोनसाठी संबंधित बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन ग्रामीण जनतेला या योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी आ. परिणय फुके यांच्यासह जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, जि.प.सभापती छाया दसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सोनाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.