रोजगार सेवकांचे मानधन द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 09:59 PM2018-08-06T21:59:44+5:302018-08-06T22:00:05+5:30
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत रोजगार सेवकांना त्यांचा कामाचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत रोजगार सेवकांना त्यांचा कामाचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्यावतीने करण्यात येणाºया कामाचा लेखाजोगा गावपातळीवर रोजगार सेवक करतात. रोहयो कामाच्या अंदाजपत्रकावर रोजगार सेवकाचा मेहनताना काढला जातो, असे समजते. तालुक्यातील रोजगार सेवकांना मागील सहा महिन्यांपासून केलेल्या कामाचा मेहनताना मिळाला नाही. नियमित मोबदला मिळत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार सेवकांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन अविलंब मागील ६ महिन्यांपासूनचा थकीत मेहनताना देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे केली आहे.
तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मग्रारोहयो) यांना सुध्दा निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
अन्यथा कामबंद आंदोलन
तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने १४ फेब्रुवारी २०१८ ते ३१ मार्च १८ व १ एप्रिल १८ ते ३१ जुलै १८ पर्यंतचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांना शनिवारी (दि.४) दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सभापती शिवणकर यांनी त्याचक्षणी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना निवेदन पाठवून रोजगार सेवकांचा ६ महिन्यांपासून थकीत असलेला मेहनताना देण्यासंबंधी साकडे घातले. तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने रोजगार सेवकांचा दर ३ महिन्यांनी मोबदला काढण्यात यावा, अशी मागणीसुध्दा करण्यात आली आहे.