५८ जणांच्या खांद्यावर ७० गावांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:10 AM2021-08-02T04:10:43+5:302021-08-02T04:10:43+5:30
सुरेश येडे रावणवाडी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील पोलीस ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ठाण्यात ...
सुरेश येडे
रावणवाडी : महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील पोलीस ठाण्याला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. ठाण्यात कार्यरत ३ अधिकारी व ५५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ७० गावांची जबाबदारी आहे. परिणामी पोलीस कर्मचारी कामाच्या ताणात असतानाच सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
रावणवाडी पोलीस ठाण्यात १४५ पोलीस कर्मचारी व ५ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र वास्तविक अर्ध्यापेक्षाही कमी अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलीस विविध घटनास्थळी वेळीच पोहचू शकत नाही. मात्र त्यानंतरही रावणवाडी पोलीस आपले कर्तव्य पूर्ण जबाबदारीने पार पाडत आहेत. परिसरातील नागरिकांना पोलीस सुविधा वेळीच मिळावी यासाठी सुमारे १० वर्षांपूर्वी रावणवाडी पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. मात्र केवळ ३० टक्के कर्मचारी कार्यरत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. दोन राज्यातील वाहनांची येथून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यामुळे कित्येक अपघात घडत असून हद्दीतील गावांमध्ये विविध गु्न्ह्यांच्या तक्रारीही येतात. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना वेळीच पोलिसांची मदत मिळत नाही. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे पोलिसांची गस्तही रात्री कधी कधीच होते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत रावणवाडी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
----------------------------
भाड्याच्या घरात सुरू आहे ठाणे
येथील पोलीस ठाणे एका भाड्याच्या घरात सुरू आहे. एखाद्या आरोपीला कोठडीत ठेवण्याची गरज पडल्यास रावणवाडी पोलिसांना त्या आरोपीला अन्य ठाण्यात ठेवावे लागते. परिणामी पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ठाण्यात आरोपीला ठेवण्याची सुविधा असती तर, पोलिसांना कारवाई करण्यात सुविधा झाली असती.
----------------------------
कासव गतीने सुरू आहे इमारत बांधकाम
पोलीस ठाणे इमारत व कर्मचारी क्वार्टर्सचे बांधकाम मागील ४ वर्षांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. कासव गतीने सुरू असलेले काम बघता हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी २ वर्षे लागू शकतात. लवकरात लवकर पोलीस ठाणे व क्वार्टर्सचे काम पूर्ण झाल्यास पोलिसांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही.