पाण्याचे कोट्यवधी रूपये शेतकऱ्यांवर बाकी
By admin | Published: June 28, 2017 01:23 AM2017-06-28T01:23:28+5:302017-06-28T01:23:28+5:30
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे व त्यांनी दुसरे पीकसुद्धा घ्यावे. पहिल्या पिकासाठीसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये,
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे व त्यांनी दुसरे पीकसुद्धा घ्यावे. पहिल्या पिकासाठीसुद्धा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, याच उद्देशाने जलसंपदा विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पाणी वितरण संस्थांचा निर्माण करण्यात आला. या संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे वितरण शेतकऱ्यांना केले जात आहे. परंतु शेतकरी पाण्याचे कर भरत नसल्याने त्यांच्यावर १६ कोटी ९० लाख ९६ हजार रूपयांचे पाणी कर बाकी आहे.
जिल्ह्यात वाघ व इटियाडोह विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात सहजतेने पाणी पोहोचावे यासाठी पाणी वितरण संस्था तयार करण्यात आल्या. या संस्थांच्या माध्यमातून पाणी वितरणाची व्यवस्था योग्यरित्या चालविली जात आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ दरम्यान वाघ विभागाने सिंचनासाठी उपलब्ध केलेल्या पाण्याचा कर २८.३२ लाख रूपये वसूल केले आहे. गैरसिंचन सुविधेसाठी देण्यात आलेल्या पाण्याचे कर ६.१६ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे. या विभागाचे शेतकऱ्यांवर नऊ कोटी १५ लाख ५७ हजार रूपये एवढी रक्कम बाकी आहे. त्यातच इटियाडोह विभागाने सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या पाण्याचे कर एक कोटी नऊ लाख ६१ हजार रूपये वसूल केले आहे. गैरसिंचनासाठी उपलब्ध केलेल्या पाण्याचे कर १३.६१ लाख रूपये आहे. इटियाडोह विभागाच्या पाण्याचे कर शेतकऱ्यांवर सात कोटी ७५ लाख ३९ हजार रूपये बाकी आहे.
वाघ व इटियाडोह दोन्ही विभागांचे पाणी कर १६ कोटी ९० लाख ९६ हजार रूपये बाकी आहे. केवळ आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्येच नव्हे तर अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर या विभागांची बाकी रक्कम प्रलंबित पडून आहे. पाणी तर घ्यावे मात्र त्याचे कर भरू नये, अशी शेतकऱ्यांची मानसिकताच बनली आहे.
विशेष म्हणजे पाणी वितरणाच्या सहकारी संस्थांना याच्या वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत व वसुलीच्या रकमेतून अर्धी रक्कम संबंधित संस्थांनाच वितरित केली जात आहे.
ही रक्कम त्या संस्थांच्या विकासासाठी उपलब्ध केली जात आहे.
शेतकऱ्यांना पाण्याचे कर भरण्यास सांगितले जात आहे. परंतु पर्याप्त रक्कम मिळत नसल्याने पाणी वितरण संस्थांनासुद्धा लाभ मिळत नाही. शासकीय योजनांना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समस्या निर्माण होत आहे. जास्तीत जास्त कराची रक्कम भरावी, अशी शेतकऱ्यांना विनंती आहे.
एच.वाय. छप्परघरे,
कार्यकारी अभियंता,
वाघ व इटियाडोह सिंचन विभाग, गोंदिया.