निलंबित ग्रामसेवकांना पुनर्स्थापित करा
By admin | Published: February 7, 2017 12:54 AM2017-02-07T00:54:21+5:302017-02-07T00:54:21+5:30
जिल्ह्यातील ५५१ ग्रामपंचायतींचा कारभार ३५० ग्रामसेवक सांभाळतात.
ग्रामसेवक युनियनची मागणी : उपमुख्य कार्यपालन अधिकारी देतात त्रास
गोंदिया : जिल्ह्यातील ५५१ ग्रामपंचायतींचा कारभार ३५० ग्रामसेवक सांभाळतात. विपरीत परिस्थितीत जिद्द व चिकाटीने काम करणाऱ्या ग्रामसेवकांना उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश बागडे त्रास देत असून ते निलंबीत ग्रामसेवकांना पुनर्स्थापीत करीत नाही. यामुळे त्यांचे विरोधात ग्रामसेवकांचा आक्रोश असून त्रास देणाऱ्या बागडे यांच्यावर कारवाई करावी व ग्रामसेवकांना पुर्नस्थापित करावे, अशी मागणी ग्रामसेवकांनी एका पत्रातून केली आहे.
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तसेच जंगलाने व्यापलेला असून शासनाच्या लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम ग्रामसेवक करतात. हे काम करताना त्याच्या समोर विविध आव्हाने समोर उभी राहत असतात. तरी ही उपमुख्य कार्यपालन अधिकारी बागडे त्यांना दमदाटी देऊन असभ्य शब्दांचा वापर करतात. दबावतंत्र टाकून आर्थिक पिळवणूक करण्याचे काम करतात. त्यांची मागणी पूर्ण न केल्यास निलंबीत करतात.
जिल्ह्यातील २३ ग्रामसेवक आतापर्यंत निलंबीत झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सात लोकांना पकडले. मात्र इतरांना का निलंबीत करण्यात आले. तणावात काम करणाऱ्या ग्रामसेवकांना वेठीस धरणे ते योग्य नाही.
या अन्यायाविरुध्द लढून सामूहिक राजीनामा देण्याचा विचार आमच्या संघटनेचा असल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण, प्रदीप ठाकरे, कमलेश बिसेन, वनिता कांबळे, पी.बी.कटरे, एल.आर.ठाकरे, योगेश रुद्रकार, सुनिल पटले व इतरांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)
२३ ग्रामसेवकांपैकी सात ग्रामसेवकांना एसीबीने पकडले. तर काहींवर फौजदारी गुन्हे दाखल झाले. ज्यांनी शासनाचा निधीची अफरातफर केली तेच निलंबित करण्यात आले आहे. रेकार्ड न ठेवणाऱ्या ग्रामसेवकांच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्या त्यानंतर रितसर चौकशी करूनच निलंबित करण्यात आले.
-राजेश बागडे
उपमुख्य कार्यपालन अधिकारी, पंचायत जि.प. गोंदिया.