गावातील विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:35 AM2021-09-07T04:35:01+5:302021-09-07T04:35:01+5:30
साखरीटोला : मागील बऱ्याच दिवसांपासून गावातील पथदिवे बंद असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकरी त्रस्त असून ...
साखरीटोला : मागील बऱ्याच दिवसांपासून गावातील पथदिवे बंद असल्याने गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकरी त्रस्त असून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यावर सोमवारी (दि.६) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जियालाल पंधरे यांच्या नेतृत्वात विविध गावातील सरपंच-उपसरपंच व गावकऱ्यांनी येथील शाखा अभियंता बिसेन यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.
आमगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत देवरी, आमगाव व सालेकसा या तिन्ही तालुक्यांतील बऱ्याच गावांना साखरीटोला येथील वीज केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. साखरीटोला, तिरखेडी यासारख्या तीन फिडर अंतर्गत असलेल्या कारुटोला, अंजोरा, येरमडा, सोनेखारी, कवडी, वळद, पानगाव, साखरीटोला, गांधीटोला, कोपीटोला, तिगाव व इतर काही गावांतील पथदिवे बंद आहे. कोरोनाकाळात ग्रामपंचायतींचे वीज बिल लाखो रुपयांवर गेल्याने बिल भरण्यात अडचणी आली तसेच पूर्वी पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषद भरत होती. मात्र, सध्या तरी सदर बिल भरण्यात न आल्याने वीज मंडळाने पथदिव्यांची जोडणी कापली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
पथदिवे बंद राहत असल्याने रात्रीला गावात अंधार राहत असून पावसाळ्यामुळे साप, विंचू व किड्यांची भीती निर्माण झाली आहे. अशात अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनासुद्धा सरपंच संघटनेकडून विनंती करण्यात आली आहे. अन्य विधानसभा क्षेत्रातील पथदिवे सुरू झाल्याची माहिती आहे. आमगाव विधानसभा क्षेत्राचे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिन्ही फिडरमध्ये असलेल्या गावातील स्टेट लाईट सुरू करावी, अशी मागणी कारूटोलाचे सरपंच उमराज बोहरे, साखरीटोलाचे सरपंच नरेश कावरे, पानगाव सरपंच मालदेव दोनोडे, सरपंच योगेश्वरी तुरकर, सरपंच कमलेश्वरी भेलावे, नरेंद्र शिवणकर, उपसरपंच अरविंद फुंडे, बबलू बिसेन, अनिल परसमोडे, ललीत ठाकुर, लखन भलावी, दुर्गेश पटले, संतोष फुंडे, कुमार तुरकर, राजेश किरसान यांनी केली आहे.
------------------------------
ग्रामपंचायतींवर लाखो रुपये वीज बिल थकून आहे. वीज बिल पूर्वीपासून शासन भरत होते तसेच आतासुद्धा शासनाने भरायला पाहिजे व गावकऱ्यांना अंधारातून उजेडात आणायला पाहिजे.
जियालाल पंधरे, माजी जि. प. सदस्य