‘क्राईमवर कंट्रोल’साठी जामिनालाच लगाम
By admin | Published: July 30, 2015 01:36 AM2015-07-30T01:36:56+5:302015-07-30T01:36:56+5:30
गुन्हा केल्यावर पोलिसांनी एखाद्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर लगेच तो आरोपी जामिनावर सुटका करून घेतो.
रामनगर पोलिसांचा प्रयोग : तीन गुन्ह्यातील आरोपींना नाकारला जामीन
गोंदिया : गुन्हा केल्यावर पोलिसांनी एखाद्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर लगेच तो आरोपी जामिनावर सुटका करून घेतो. यानंतर तो आरोपी पुन्हा दुसरा गुन्हा करण्याची तयारी करतो. यामुळे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असते. या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी अटक केलेल्या आरोपीला जामीनच मिळू द्यायचा नाही, असा संकल्प रामनगर येथील नवनियुक्त ठाणेदार बाळासाहेब पवार यांनी केला आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तीन गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळू नये यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्न करून तशी बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडली. यामुळए तीन प्रकरणातील दहा आरोपींना जामीन मिळालाच नाही.
रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ मध्ये उदय भालेकर उर्फ रंजीत देवेंद्र पुरी रा. मुंबई, श्रवणकुमार जयेशराम यादव (३५) रा. मुंबई ठाणे व संगीता सरोजकुमार सायंना (३५) रा. पालघर ठाणे या तिघांना जामीन मिळू दिला नाही. या तिघांनी इंडियन एअरलाईन्स मुंबईचे ५६ लाखांचे बनावट धनादेश तयार करून ते पैसे खात्यातून वटविले. त्यांनी जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात १८ जुलै रोजी अर्ज केला. मात्र पोलीस निरीक्षक पवार यांनी त्यांचा जामीन मंजूर होऊ नये यासाठी न्यायालयाला सादर केलेल्या कागदपत्रात आरोपी बाहेर आल्यास पुन्हा गुन्हा कसे करू शकतात हे न्यायालयाला पटवून दिले. त्यामुळे त्या आरोपींचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला.
दुसऱ्या एका गुन्ह्यात कलम ३६४ अ, ३८५, १२० ब, ५०६, ३४ अंतर्गत अटकेत असलेले आरोपी गोकूल मनिराम मंडलवार (२५), राजा बबलू सागर (२५)विजय कृष्णा चौधरी (३०) रा.बालाघाट, मोहम्मद सर्फराज रजा उर्फ जमीलभाई अब्दुल करीम कुरेशी (३६) रा. रामनगर, निशा उर्फ पिंकी उर्फ सिमा राणा चमनलाल मरठे (१९) रा.गोंदिया व गीता उर्फ पूजा गोकुल मंडलवार (२३) रा.बालाघाट या सहा जणांना जामीन मंजूर होऊ नये, ते समाजासाठी कसे घातक आहेत हे पोलीस निरीक्षक पवार यांनी न्यायालयासमोर मांडले. परिणामी त्यांचाही जामीन रद्द झाला. रामनगरातील एका मुलीला प्रेमात अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवेगावबांध येथील रोहीत रमेश बागळे (१९) यालाही जामीन मंजूर होऊ दिला नाही.
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांना आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना तुरूंगातच ठेवल्यास समाजात वावरणाऱ्या इतर गुन्हेगारांमध्ये धसका बसून ते गुन्हे करण्यास घाबरतील या कारणाने त्यांचे जामीन कसे रद्द करता येईल, याकडेच त्यांनी आधी लक्ष केंद्रीत केले आहे. हा प्रयोग जिल्ह्यात अनोखा ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)
न मारता गुन्हे नियंत्रणात
एखाद्या आरोपीने गुन्हा केला तरी त्याला मारू नका असे मानवाधिकार सांगत असल्याने आरोपींना न मारताही गुन्हे नियंत्रणात येऊ शकतात. गुन्हा केलेल्या आरोपीला जामीन होऊच द्यायचा नाही. त्यासाठी न्यायालयात पोलीस यंत्रणेकडून तसे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जामिनाचा अर्ज रद्द होत असल्याचे पाहून इतर आरोपी गुन्हे करणार नाहीत. अटक झालेले आरोपी तुरूंगातच राहतील.
गुन्हेगारांना मारहाण केल्यास ते गुन्हे करायला विसरत नाही. त्यांना हात न लावता त्यांचा जामीनच होऊ द्यायचा नाही, असा संकल्प प्रत्येक तपासी अंमलदाराने केल्यास आरोपींचा जामीन होणार नाही. परिणामी आरोपींना तुरूंगातच राहावे लागेल. तो आरोपी बाहेर आल्यास तो समाजासाठी कसा घातक आहे हे पटवून दिल्यामुळे सदर आरोपींचा जामीन न्यायालय मंजूर करणार नाही.
- बाळासाहेब पवार
पोलीस निरीक्षक, पो.स्टे. रामनगर