बोगस पत्रकारांवर आळा घाला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:26 AM2021-03-24T04:26:47+5:302021-03-24T04:26:47+5:30
आमगाव : संपूर्ण जिल्ह्यात काही लोक पत्रकारितेच्या नावाखाली विविध उद्योग करीत असल्याने प्रतिष्ठित पत्रकार बदनाम होत ...
आमगाव : संपूर्ण जिल्ह्यात काही लोक पत्रकारितेच्या नावाखाली विविध उद्योग करीत असल्याने प्रतिष्ठित पत्रकार बदनाम होत आहेत. अशा बोगस पत्रकारांवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षकांना हे निवेदन पाठविण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यात खाजगी वाहनांवर ‘प्रेस’ लिहिलेले व ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली कसलीही नोंदणी नसलेले स्वयंघोषित काही लोक सामान्य नागरिक व अधिकाऱ्यांमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच यूट्युबवर चालणारे चॅनलचे पत्रकार निर्माण झाले आहेत. कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये काम न करणारे व केवळ संकेतस्थळावर चुकीचे लिखाण करून नागरिक व अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याचा प्रकार हे बोगस पत्रकार करीत असल्याचे दिसून येत आहे. सूचना व प्रसार मंत्रालयात नोंदणी नसलेले यूट्युबवर अनेक चॅनल सुरू आहेत. यामुळे समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे, सर्वसामान्यांची बाजू मांडणारे पत्रकार बदनाम होत आहेत. याकरिता बोगस पत्रकारांवर आळा घालण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना आमगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुलाल भालेकर, सचिव राधाकिसन चुटे, कोषाध्यक्ष सुनील क्षीरसागर, राजीव फुंडे आदी उपस्थित होते.