निर्बंध शिथिल झाले, कोरोना नव्हे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:00 AM2021-06-02T05:00:00+5:302021-06-02T05:00:02+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१) काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी सुध्दा रुळावरुन घसरली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. मात्र याचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावत शहरातील बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. जणू कोरोना पूर्णपणे निघून गेल्याच्या आविर्भावात नागरिक वावरत होते. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळला नसून पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. केवळ निर्बंध शिथिल झाले कोरोना नव्हे हे सांगण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (दि.१) काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी सुध्दा रुळावरुन घसरली होती. याला गती देण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहे. यातंर्गत मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजतापर्यंत तर इतर दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. तब्बल दीड महिन्यानंतर सर्वच दुकाने उघडल्याने शहरवासीयांनी सकाळी बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्यातून कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे संपल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये वावरताना नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा सुध्दा विसर पडल्याचे चित्र होते.
इतर दुकाने राहणार आता दुपारी २ पर्यंत सुरु
जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी मंगळवारी सुधारित आदेश काढीत अत्यावश्यक सेवे शिवाय इतर दुकाने सुध्दा बुधवारपासून (दि.२) दुपारी २ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यावसायींकाना मोठा दिलासा मिळाला आहे. दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली असली तरी दुकानदार आणि ग्राहकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. अन्यथा कारवाईला पुढे जावे लागले.
नागरिकांनो नियमांचे करा पालन
कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. मागील दीड महिना जशी आपण स्वत:ची आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तशीच काळजी यापुढे सुध्दा घ्या, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, बाजारपेठेत गर्दी करु नका. अन्यथा आपले थोडेही दुर्लक्ष कोरोना संसर्गाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते.
व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी थोडा गम
जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने केवळ सकाळी ११ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. तब्बल दीड महिन्यानंतर दुकाने सुरु झाल्याने व्यावसायिकांमध्ये थोडी खुशी होती तर केवळ चार तासच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने थोडे नाराजीचे वातावरण होते.