३१५१ गावकारभाऱ्यांचा रिझल्ट आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:26 AM2021-01-18T04:26:46+5:302021-01-18T04:26:46+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या १३८२ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यासाठी एकूण ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामपंचायतीसाठी ...

Result of 3151 villagers today | ३१५१ गावकारभाऱ्यांचा रिझल्ट आज

३१५१ गावकारभाऱ्यांचा रिझल्ट आज

Next

गोंदिया : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतींच्या १३८२ जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यासाठी एकूण ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामपंचायतीसाठी ७९.८३ टक्के मतदान झाले. सोमवारी (दि.१८) मतमोजणी होणार असून ३१५१ गावकारभाऱ्यांचा रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते आणि कोणासाठी विजयाचा सुपर मंडे ठरतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील मुदत पूर्ण झालेल्या एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पण, आठ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली, तर ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १३८२ जागांसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यासाठी एकूण ७९.८३ टक्के मतदान झाले. यात एक लाख २६ हजार १४४ महिला आणि एक लाख २५ हजार ६०४ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाल्याने मतदारांमध्येसुद्धा या निवडणुकीबाबत उत्साह दिसून आला. निवडणूक रिंगणात जरी ३१५१ उमेदवार असले, तरी प्रत्यक्षात १३८२ जागा आहेत. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते आणि कुणाला गावाच्या विकासाचा गाडा पुढे खेचण्याची संधी मिळते, याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

.......

सकाळी १० वाजतापासून होणार मतमोजणीला सुरुवात

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजतापासून प्रत्येक तालुकास्तरावर सुरुवात होणार आहे. गोंदिया येथे जिल्हा क्रीडासंकुल परिसरात मतमोजणी होणार असून यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३७ ग्रामपंचायतींची निवडणूक ही गोंदिया तालुक्यात होती. त्यामुळे याच तालुक्याच्या मतमोजणीला थोडा वेळ लागणार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

.........

सरपंचासाठी करावी लागेल प्रतीक्षा

राज्य निवडणूक आयोगाने यंदा निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत फारशी चुरस दिसून आली नाही. मात्र, खर्चाला निश्चितच लगाम लागला. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर गावकऱ्यांना मात्र आपल्या गावचा सरपंच कोण होणार, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

....

नजरा आरक्षणाकडे

सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने अद्यापही जाहीर केला नाही. मात्र, येत्या आठवडाभरात ते जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या आहेत.

......

चाचणी परीक्षेवरून कळणार कल

जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ पाच महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे यासाठीसुद्धा लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्याने याच्या निकालावरून मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे, याचेसुद्धा चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Result of 3151 villagers today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.