एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसऱ्या दिवशी परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:27 PM2018-06-09T22:27:14+5:302018-06-09T22:27:14+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला शनिवारी (दि.९) दुसऱ्या दिवशीही तिरोड्यात चांगला तर गोंदिया आगारात थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (दि.७) मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला शनिवारी (दि.९) दुसऱ्या दिवशीही तिरोड्यात चांगला तर गोंदिया आगारात थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तिरोडा आगारातून दिवसभरात केवळ तीन बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली पगारवाढ मान्य नसल्यामुळे गुरूवारपासून राज्यभरातील एस. टी. कर्मचारी संपावर गेले आहे. या संपाचा परिणाम शनिवारी गोंदिया व तिरोडा आगारात जाणविला. गोंदिया आगारात एकूण ९१ बसेस असून यापैकी ८६ बसेसच्या सुरळीत सुरू होत्या. या संपात आगारातील १९ चालक व २७ वाहक सहभागी झाले होते. त्यामुळे याचा ३२ टक्के बस फेºयांवर परिणाम झाल्याचे कर्मचाºयांनी सांगितले.
तिरोडा आगारातून शनिवारी दिवसभरात केवळ तीन बसेस सोडण्यात आल्या. उर्वरित ४२ बसेस आगारात उभ्या होत्या. ७० चालक, ६५ वाहक व २० इतर कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही बसफेऱ्या न झाल्याने आगाराला तीन ते चार लाख रुपयांचा फटका बसला. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गांना ये-जा करण्यास बसेस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी जाता आले नाही. इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक प्रवाशांना काळी पिवळी वाहनाचा आधार घ्यावा लागला. या संपात सहभागी झालेले कर्मचारी बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसले होते. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.