पुन्हा सुरू होणार लर्निंग लायसंस कॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 06:00 AM2019-12-02T06:00:00+5:302019-12-02T06:00:26+5:30
५ वर्षापूर्वी परवाना घेण्यासाठी लर्निंग लायसंसचे कॅम्प घेतले जात होते. परंतु जो पैसे देतो त्यालाच पास केले जाते असा आरोप होत होता. त्यामुळे संचालकांनी हे कॅम्प बंद केले होते. परंतु आता पुन्हा हे कॅम्प सुरू करण्यात येत आहेत. आधी सामाजिक संस्थांकडूनही कॅम्प आयोजित केले जात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा शेकडो किलो मीटरच्या अंतरात पसरला असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन आणून त्यांची पासींग करणे कठिण होते. त्यामुळे अनेक लोक वाहनांची पासींग करीत नाही. शेतीसाठी वापरणाºया बहुतांश वाहनांची पासींग केली जात नाही व तशीच वाहने चालविली जातात. यासाठी त्या वाहनांची तपासणी व ग्रामीण भागातील लोंकांना सहजरित्या लर्निंग लायसंस बनविता यावे यासाठी आता कॅम्पच्या माध्यमातूनही लर्निंग लायसंस बनविण्यात येईल.
५ वर्षापूर्वी परवाना घेण्यासाठी लर्निंग लायसंसचे कॅम्प घेतले जात होते. परंतु जो पैसे देतो त्यालाच पास केले जाते असा आरोप होत होता. त्यामुळे संचालकांनी हे कॅम्प बंद केले होते. परंतु आता पुन्हा हे कॅम्प सुरू करण्यात येत आहेत. आधी सामाजिक संस्थांकडूनही कॅम्प आयोजित केले जात होते. परंतु त्याचे श्रेय त्या संस्था लाटून घेत असल्यामुळे आता हे कॅम्प फक्त शासनाच्याच माध्यमातून म्हणजे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातूनच घेतले जातील. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात तीन ठिकाणी हे कॅम्प घेतले जाणार आहेत. या कॅम्प मधील लोकांना मात्र आॅनलाईन परीक्षा द्यावी लागेल. ती आॅनलाईन परीक्षा त्याच ठिकाणी टॅबवर घेण्यात येईल.
अनेक लोक शेतीसाठी वापरणारे ट्रॅक्टर पासींग करीत नव्हते. याला लगाम लावण्यासाठी ही कॅम्पची योजना नव्याने राबविण्यात येणार आहे. शिबिरात लर्निंग लायसंस बनविण्यासाठी इच्छुकांना शिबिराच्या तारखेपूर्वी ५ दिवस आधी वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यांनी अर्जासोबत सर्व कागदपत्र अपलोड करून कॅम्पच्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले आहे.
दर महिन्यात होणार शिबिर
लर्निंग लायसंसकरीता दर महिन्याला जिल्ह्यातील तिरोडा, देवरी व अर्जुंनी-मोरगाव या तीन तालुक्यांत तालुकास्थळी शिबिर घेतले जाणार आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला तिरोडा येथे, १७ तारखेला देवरी येथे तर २४ तारखेला अर्जुनी-मोरगाव येथे शिबिर घेण्यात येईल. प्रत्येक तालुक्याच्या शासकीय विश्रामगृहात हे शिबिर घेतले जाणार आहे.