सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:32 PM2019-07-11T22:32:56+5:302019-07-11T22:33:30+5:30
वन विकास महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी पेन्शनसाठी संबंधित विभाग आणि बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वन विकास महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी पेन्शनसाठी संबंधित विभाग आणि बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची फरफट कायम आहे.
वनविकास महामंडळातून वनक्षेत्रपाल म्हणून सेवानिवृत्त झालेले डी.बी.भावे यांना मागील दोन महिन्यापासून पेन्शन मिळाली नाही. संबंधित विभागाचे अधिकारी लवकरच पेन्शन मिळेल असे आश्वासन देतात. मात्र अद्यापही त्यांना पेन्शन मिळाली नाही.
सेवानिवृत्तीनंतर पेन्शन ही या कर्मचाऱ्यांचा आधार असतो.यातूनच त्यांना महिनाभराचा कुटुंब आणि औषध पाण्याचा खर्च करावा लागतो.शिवाय जास्त धडपड करणे सुध्दा त्यांना जमत नाही.मात्र संबंधित विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे त्यांना पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन लागू करण्यात आली. यासाठी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पैसे भरण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार भावे यांनी १ लाख २० हजार ८७६ रुपयांची वाढीव रक्कम देखील भरली. याला आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही त्यांना वाढीव पेन्शन मिळाली नाही.त्यामुळे त्यांच्या जवळची जमापुंजी सुध्दा आता शिल्लक राहिली नाही. पेन्शन मिळण्यास तीन तीन महिने उशीर होत असल्याने भावे यांच्याप्रमाणेच इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बँकेच्या आणि संबंधित विभागाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची नागपूर येथील पेन्शन आयुक्तांनी दखल घेवून सेवानिवृत्त कर्मचाºयांची समस्या दूर करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली आहे.