नोकरी लावून देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:29+5:302021-08-29T04:28:29+5:30
गोंदिया : छत्तीसगडच्या तरुणींना रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावावर त्यांना कोलकाता येथे घेऊन जात असताना मोहननगर पोलिसांनी दुर्ग येथील ...
गोंदिया : छत्तीसगडच्या तरुणींना रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावावर त्यांना कोलकाता येथे घेऊन जात असताना मोहननगर पोलिसांनी दुर्ग येथील रेल्वेस्थानकावर एका सेवानिवृत्त सैनिकाला अटक करण्यात आली. उत्तम मोहन खांडेकर (वय ५०, रा. तांडा, ता. जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मुलींची तस्करीही करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
दुर्ग जिल्ह्यात शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या नावावर फसवणूक करणाऱ्या त्या आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीने दोन मुलींना नोकरी देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून १० हजार रुपये घेतले होते. त्या मुलींना घेऊन तो कोलकाता येथे जाणार होता. त्याला जाण्यापूर्वीच दुर्गच्या रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. मोहननगर येथील ठाणेदार जितेंद्र वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उत्तम खांडेकर हा सैन्यदलात १८ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाला. काही दिवसांपूर्वी आरोपीची एका मार्टमध्ये तरुणीशी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्याने तिला नोकरीचे आमिष दाखविले. त्या मुलीने याची माहिती आपल्या मैत्रिणीला दिली. त्या दोघीही नोकरी करण्यासाठी तयार झाल्या. नोकरीसाठी वैद्यकीय चाचणी करण्याकरिता त्यांना कोलकात्याला जाण्यासाठी त्याने २० ऑगस्टला आरक्षणासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले. नोकरी लागल्यावर एक-एक महिन्याचे वेतन देण्याची मागणी केली. त्यावर त्या मुलींनी १० हजार रुपये त्याला दिले होते. तो कोलकात्याला जाणार एवढ्यातच पोलिसांनी रेल्वेस्थानक गाठून त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध मोहननगर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दखल केला आहे.