पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:37+5:30
एच.आर.ठाकरे असे त्या सेवानिवृत्त वन कर्मचाºयाचे नाव आहे. ठाकरे हे वन विभागात काम करीत असल्याने पर्यावरण संवर्धनाबद्दल सुरूवातीपासूनच रुची होती. दोन वर्षांपूर्वीच ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बराच वेळ त्यांच्याकडे असल्याने त्यांनी या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल जनजागृती करण्याचा संकल्प केला. यानंतर त्या दिशेने कार्य सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पशु पक्ष्यांचे मानवी जीवनात विशेष महत्त्व आहे. तंत्रज्ञानाचा शोध लागण्यापूर्वी ऋतुंची चाहुल आणि वातावरणातील बदलांचा अंदाज हा पक्ष्यांच्या हालचालींवरुन लावला जात होता. जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि सिंमेटच्या वाढत्या उंच इमारतींमुळे शहरांमधील झाडांचे प्रमाण कमी झाल्याने पक्ष्यांची किलबिलाट सुध्दा नाहीशी झाली.मात्र ही किलबिलाट पुन्हा ऐकायला मिळायला हवी, पक्ष्यांचे संवर्धन व्हायला हवे यासाठी गोरेगाव तालुक्यातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची मागील दोन वर्षांपासून धडपड सुरू आहे.
एच.आर.ठाकरे असे त्या सेवानिवृत्त वन कर्मचाºयाचे नाव आहे. ठाकरे हे वन विभागात काम करीत असल्याने पर्यावरण संवर्धनाबद्दल सुरूवातीपासूनच रुची होती. दोन वर्षांपूर्वीच ते वन विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बराच वेळ त्यांच्याकडे असल्याने त्यांनी या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल जनजागृती करण्याचा संकल्प केला. यानंतर त्या दिशेने कार्य सुरू केले. वातावरणातील बदलांचा आणि वाढत्या तापमानाचा फटका तसेच शहरांमध्ये वाढत चालली मोबाईल टॉवरची संख्या यामुळे चिमणी, कावडा, घार, गिधाड यासह अनेक पक्षी लुप्त होत चालले आहे. पूर्वी पहाटेच्या सुमारास ऐकू येणारी पक्ष्यांची किलबिलाट आता ऐकायला येत नाही. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती या नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या पिढीला या पक्ष्यांची केवळ चित्रच पाहयला मिळतील. त्यामुळे पक्ष्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. नेमका हाच संदेश ठाकरे हे नागरिकांना देत आहेत.
ते जिथे जातील तिथे पक्ष्यांचे संवर्धन आणि पक्ष्यांसाठी आपल्या घरासमोर एका पात्रात पाणी ठेवण्याचा संदेश देतात. त्यांनी त्यांच्या दुचाकीला सुध्दा पक्ष्यांसदर्भात जनजागृती करणारे फलक लावले आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी नागरिकांनी कुठल्या उपाययोजना कराव्यात आणि काय काळजी घ्यावी याविषयी ते जनजागृती करीत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून याबद्दल ते जनजागृती करीत आहे.
पर्यावरण संवर्धनाची मला सुरूवातीपासूनच आवड होती. त्यातच सेवानिवृत्त झाल्यानंतर कसलेही काम नसल्याने पर्यावरण आणि पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. मागील दोन वर्षांपासून हे कार्य करीत आहे.
- एच.आर.ठाकरे,
सेवानिवृत्त वन कर्मचारी.
पक्ष्यांसाठी सुरू करा पाणपोई
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो.त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी प्रत्येकांनी आपल्या घराच्या बाहेर, झाडावर एका पात्रात पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. मानवाप्रमाणेच पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू करण्याचा सल्ला ते नागरिकांना देत आहे.