प्रोजेक्टर भेट देऊन शैक्षणिक उपकाराची परतफेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2017 12:34 AM2017-02-12T00:34:44+5:302017-02-12T00:34:44+5:30
ज्या शाळेने आपल्याला घडवले, चांगले शिक्षण व संस्कार दिले त्या शाळेच्या उपकाराची परतफेड करणे तर कोणालाच शक्य नसते,
माजी विद्यार्थ्याचे दातृत्व : उपायुक्त वंजारी यांचा डिजिटल शाळेसाठी पुढाकार
खातिया : ज्या शाळेने आपल्याला घडवले, चांगले शिक्षण व संस्कार दिले त्या शाळेच्या उपकाराची परतफेड करणे तर कोणालाच शक्य नसते, पण शक्य ती मदत करून त्यातून काही प्रमाणात का होईना उतराई होण्याचा प्रयत्न बिरसी जि.प.शाळेचे माजी विद्यार्थी आणि सध्या विक्रीकर उपायुक्त असलेले धनंजय वंजारी यांनी केला आहे.
वंजारी यांनी बिरसी जिल्हा परिषद शाळेत १९८३ मध्ये दाखल होऊन शिक्षण सुरू केले होते. पुढे ते उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) दाखल झाले. सध्या ते विक्रीकर उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. इतर शाळांप्रमाणे आपलीही शाळा डिजीटल झाली पाहीजे असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या वतीने मदत म्हणून शाळेसाठी प्रोजेक्टर भेट देण्याचे ठरविले होते.
कामठा केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळा जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी त्यांनी पाठविलेले प्रोजेक्टर स्वीकारण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रविंद्र तावाडे तर उद्घाटन सेवा सोसायटी ग्राम बिरसी अध्यक्ष रामप्रसादसिंह पंडेले यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मिरा तावाडे, रुपसिंह बाट, पोलीस पाटील महेश सहारे, उपसरपंच मुन्ना मेश्राम, माजी सरपंच गणेशसिंह मुन्डेले, संतोष वंजारी, नारायण वंजारी, भैयासिंह कोहरे, नरेंद्र बोरकर, नत्थु शेंडे आणि अनेक प्रमुख नागरी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या रंगारंग प्रस्तुतीने सर्व गावकऱ्यांची मने जिंकून घेतली. यावेळी वंजारी यांनी पाठविलेले प्रोजेक्टर रोशन मेश्राम, नारायण वंजारी, भीमराज वंजारी, हितेश वंजारी, अनमोल मेश्राम, कपील श्यामकुवर आदीच्या हस्ते शाळेला देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका एस.पी.मेश्राम, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, शालेय मंत्रीमंडळ, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांनी सहकार्य केले.
संचालन बी.आर.मेश्राम यांनी केले तर आभार एस.डी.सोलंकी यांनी मानले. (वार्ताहर)
सुविधांचा लाभ घेऊन प्रगती करा- वंजारी
यासंदर्भात उपायुक्त वंजारी यांना भ्रमणध्वनीवर विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो त्यावेळी शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी या सोयी उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी आम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागले, पण आजच्या या युगामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये समोर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे आता शिक्षण घेणे सोईस्कर होत आहे. पण मोठ्या पदावर जाण्यासाठी फार कठीण परिश्रम घेणे आवश्यक आहे. डिजीटल शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.