परतीच्या पावसाने १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:00 AM2020-10-22T05:00:00+5:302020-10-22T05:00:35+5:30
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा खरीप हंगामातील १४०० हेक्टरमधील धानाला फटका बसला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे ३३ टक्केहून अधिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तयार केला असून तो लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. बरेच शेतकरी हे हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन दिवाळ सण साजरा करतात तसेच उधारउसणवारी फेडत असतात. यंदा धानाचे पीक चांगले होते. मात्र ऐन धान निघण्याच्या स्थितीत असताना त्याला परतीच्या पावसाचा फटका बसला. यंदा जवळपास ४० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी हलक्या धानाची लागवड केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी या धानाची कापणी देखील केली होती. तर काही शेतकऱ्यांनी मळणी सुरु केली होती. मात्र याच दरम्यान सलग आठवडाभर पाऊस झाल्याने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कापणी केलेल्या धानाच्या बांध्यामध्ये पाणी साचल्याने धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांवर संपूर्ण हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले आहे. यात १४०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची बाब पुढे आली आहे.
याबाबतचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. हा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
केवळ २०६ शेतकऱ्यांच्या तक्रारी
पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागते. मागील महिन्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र विमा कंपनीकडे केवळ २०६ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.
मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण कृषी विभागातंर्गत करण्यात आले. १४०० हेक्टरमधील पिकांना याचा फटका बसला असून यासंबंधिचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येईल.
- गणेश घोरपडे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.