परतीच्या पावसाने धानपिकांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:00 AM2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:11+5:30

अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.

The return rains hit the paddy fields | परतीच्या पावसाने धानपिकांना बसला फटका

परतीच्या पावसाने धानपिकांना बसला फटका

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली पिकांची पाहणी : सर्वेक्षण करुन अहवाल सादर करा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : परतीच्या पावसाने तालुक्याच्या खामखुरा, हेटी, कोरंभी,अरुणनगर शिवारात धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.१२) आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी या गावाला भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. ताबडतोब सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात शनिवारी परतीचा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. हलक्या जातीच्या वाणाचे धानपिक निघण्याच्या तयारीत आहे. त्यावर पाणी पडल्याने लोंबा गळून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आधी लागवड झालेले धान कापणीला आले आहे. अरूणनगर येथे तर एका शेतात कापणी झालेले धान या पावसाने भिजल्याचे दिसून आले. या पावसाचा फटका कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील सर्वच गावांना बसला आहे.
अनेक शेतात धान अक्षरशः लोळलेले आहे. उभ्या धानपिकात पाणी साचले आहे. अधिक दिवसात निघणाऱ्या वाणाला पाऊस फायदेशीर समजला जात असला तरी नेमके हेच धानपिक लोळलेले दिसून येत आहे. यात विशेषतः जय श्रीराम व आरपीएन या वाणाला जबर फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खामखुरा येथील विलास दुनेदार यांचेकडे सात एकर शेती आहे. संपूर्ण शेतात धानपिक लागवड केली आहे. सुमारे पाच एकर शेतातील धान लोळलेले आहे. एरव्ही एका एकरात २५ पोती धानपिक येत होते.
यावेळी एकरी १०ते १२ पोती उत्पादन येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. धानाचा दाणा भरण्यापूर्वीच शेतातील उभा धान कोसळल्याचे ते म्हणाले. यासोबतच संजय राऊत खामखुरा व सुरेश झोडे, पंढरी झोडे,निताराम झोडे रा. हेटी यांनीही आपले मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. ओमप्रकाश संग्रामे यांनी पाच एकरात जय श्रीराम या धान वाणाची लागवड केली.अर्ध्याहून अधिक शेतातील धान लोळल्याचे सांगितले. अरुणनगर या बंगाली वसाहतीतील शेतकऱ्यांनी तर २५ टक्के शेतकऱ्यांचे ९० टक्के नुकसान झाल्याचे सांगितले.
येथील शेतकऱ्यांचे नेतृत्व सरपंच बाबूल बनिक यांनी केले. यावेळी अमूल्य हलदार,अजित हलदार, राधेश्याम मंडल, गौरपाद मंडल, शांती वैद्य, देवेन्द्र गोरख पांडे, निखील रंगदार, पुलिद बाला, हरिदास महालदार,निर्मल मल्लीक, निर्मल बाईन, मेनका सरकार यांनीही आ.चंद्रिकापुरे यांना नुकसानीची माहिती दिली. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका कृषी अधिकारी लांजेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, निप्पल बरय्या, कृषी सहायक,तलाठी उपस्थित होते.

तातडीने पंचनामे करा - आ.चंद्रिकापुरे
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निमार्ण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धानपिक सुस्थितीत असताना परतीच्या पावसाने दगा दिला आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची व्यवस्था करावी असे उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्याशी बोलणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: The return rains hit the paddy fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.